झाडे पाहिले की पक्षी व्हावेसे वाटते…जितेंद्र कुवर यांच्या कवितांनी घडवले निसर्गाचे दर्शन !
जळगावच्या परिवर्तनतर्फे लेखकाचे अभिवाचन उपक्रम
जळगाव । “झाडं पाहिलं की पक्षी व्हावसं वाटतं, फांदीवर इकडं तिकडं लहरत आभाळात जावसं वाटतं…” अशा कवितांनी पक्षी, झाडे, पाने, फुलपाखरे, नदी, ढग, पाऊस यांना शब्दात बांधून कवितेतून जितेंद्र कुवर यांनी परिवर्तनच्या रसिक प्रेक्षकांना निसर्गाचे अनोखे काव्यात्म दर्शन घडवले. निमित्त होते जळगावच्या परिवर्तनतर्फे आयोजित लेखकाचे अभिवाचन या उपक्रमाचे. ( Jalgaon News )
संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. पाऊसपर्ण, चाफ्याचे फूल, व्हाईट लीली, ऋतूपर्णाच्या कविता या संग्रहातील अल्पाक्षरी कवितांनी वाचकांची दाद मिळवली. प्रेम व निसर्ग यांच्यातील नाते शब्दबद्ध केलेल्या कविताही सादर केल्या. झाड, पान, नदी आणि ऊन, या विषयावरील त्यांच्या कवितांनी रसिकांना चिंब भिजवले. जितेंद्र कुवर हे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. शासकीय काम करतांनाही त्यांच्यातला कवी हा बहरलेला असल्याची प्रतिक्रिया वाचकांनी दिली. या उपक्रमात कवितेची निर्मिती प्रक्रिया, सुचण्याविषयी, आत्मचिंतनाविषयी देखील जितेंद्र कुवर व्यक्त झाले.
याप्रसंगी महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादीया व अनिल कांकरिया यांच्या हस्ते जितेंद्र कुवर यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. याप्रसंगी लेखकाचे अभिवाचन उपक्रमाच्या प्रमुख लिना लेले यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमासाठी जेष्ठ कवी अशोक कोतवाल, नारायण बाविस्कर, कवयित्री अस्मिता गुरव, विजय लुल्हे, प्रा.राजेंद्र देशमुख, रंगकर्मी मंजुषा भिडे, अश्विनी देशमुख, शितल जैन, ज्योत्सना कुवर, शांताराम बडगुजर, प्रा.मनोज पाटील, नेहा पवार, अशोक निंबाळकर, अंजली धुमाळ, मोना निंबाळकर आदी उपस्थित होते. हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपक्रम प्रमुख डॉ.कीर्ती देशमुख यांनी या उपक्रमाची भूमिका मांडली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.