वावडदा येथील ग्रामसेवक निलंबित…१५ व्या वित्त आयोगातील अपहार भोवला !
जळगाव टुडे । तालुक्यातील वावडदा ग्रामपंचायतीच्या तत्कालिन ग्रामसेवकाला १५ व्या वित्त आयोगाच्या रकमेतील अपहार तसेच पाणीपट्टी व ग्रामनिधीची रक्कम परस्पर खर्च करणे, मासिक सभा व ग्रामसभेची नोंद प्रोसिडिंग बुकात वेळेवर न घेण्याच्या कारणावरून जळगावच्या जिल्हा परिषदेने आज बुधवारी (ता. २६) निलंबित केले. मिलिंद मिठाराम बाऊस्कर असे निलंबित झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ( Jalgaon News )
वावडद्याचे उपसरपंच अनिल आत्माराम पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनुसार, ग्रामसेवक मिलिंद बाऊस्कर यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केल्यावर त्यात तथ्य देखील आढळून आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकीत यांनी ग्रामसेवक मिलिंद बाऊस्कर यांच्यावर आता निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली आहे. बाऊस्कर यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम १९६४ मधील ३ नुसार सदरची कारवाई झाली आहे. निलंबनाच्या कालावधीत ग्रामसेवक बाऊस्कर यांना चोपडा पंचायत समितीचे मुख्यालय देण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामसेवकावरील निलंबनाच्या कारवाईनंतर वावडदा व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, वावडदा येथील सरपंच राजेश नारायण वाडेकर यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन सुद्धा उपसरपंच अनिल पाटील यांनी नाशिक येथील विभागीय आयुक्त आणि जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. त्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.