जळगाव शहरात आजपासून चार दिवस श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे आयोजन !
जळगाव टुडे । छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून जगातील पहिले श्री शिवचरित्र साहित्य संमेलन जळगाव शहरात आज बुधवार (ता. २६ ) पासून श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे निमित्त साधून विविध कार्यक्रम होणार असून, नागरिकांसाठी त्यांचा आनंद लुटण्याची संधी चालून आली आहे. ( Jalgaon News )
सातारा गादीचे छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले हे जळगावमधील श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतील. शककर्ते शिवराय या विश्वप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक विजयराव देशमुख उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. कोल्हापूर गादीचे छत्रपती संभाजी महाराज, तंजावरच्या गादीचे वारस श्रीमंत शिवाजीराजे भोसले, नागपूर गादीचे वारस श्रीमंत मुधोजीराजे भोसले तसेच छत्रपती शिवरायांच्या सोबत असणारे ७५ सरदार घराण्यांचे वंशज श्री शिवचरित्र साहित्य संमेलनास उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय जगातील सर्वात मोठे नाणे संग्राहक किशोर चंडक सोलापूर, तुळजाभवानी शस्त्र प्रशिक्षण संस्था पुणे यांचे शस्त्र प्रदर्शन, प्रवीण भोसले (सांगली) यांच्याकडील तीनशे मराठ्यांच्या समाधीचे चित्ररुपी प्रदर्शन, संकेत गांगुर्डे यांचे पगडी प्रदर्शन, संतोष आवटी (जालना) यांचे चित्र प्रदर्शन, सतीश दुधाने यांचे वीरगळ प्रदर्शन, महेश पवार यांचे आरमार प्रदर्शन साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.