जळगाव दूध संघाचा मोठा निर्णय, जिल्ह्यातील उत्पादकांना 1 मे पासून देणार सर्वाधिक खरेदी दर

गायीच्या दूध खरेदी दरात 2.40 रूपये व म्हशीच्या दूध खरेदी दरात 2 रूपयांची वाढ

Jalgaon Today : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाने 1 मे 2024 पासून गाय व म्हशीच्या दुध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गायीच्या दुध खरेदी दरात 2.40 रूपयांची वाढ करण्यात आली असून, 3.5/8.5 फॅटसाठी 29.40 रूपये असा दर यापुढे असेल. तसेच म्हैस दुध खरेदी दरात देखील 2.00 रूपयांची वाढ करण्यात आली असून 6.0/9.0 फॅटला 46.40 असा दर यापुढे राहील. यामाध्यमातून जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ (Jalgaon Milk) हा महाराष्ट्र व गुजरातमधील नामांकित दूध संघांपेक्षा जास्त दर देणारा संघ ठरला आहे. दूध संघाच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत केले जात आहे.

जागतिक पातळीवरील दूध भुकटी व लोणीचे दर खालावल्यामुळे काही महिन्यांपासून देशभरातील सहकारी व खाजगी दुध संघांनी आपले दुध खरेदी दर कमी केले होते. विशेष म्हणजे शासनाने ठरवून दिलेल्या किमान 27 रुपये प्रति लिटर दरापेक्षा कमी म्हणजे 25 रुपयांपर्यंत दर काही दुध संघांनी कमी केले होते. तरी देखील शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेत जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाने आपले दुध खरेदी दर 27 रुपयांच्या खाली जाऊ दिले नव्हते. जळगाव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दुध खरेदी करणाऱ्या महाराष्ट्र व गुजरातमधील सहकारी व खाजगी दुध संघांनी सुगीच्या काळात म्हणजे दुधाची मागणी कमी व पुरवठा जास्त असतो अशा वेळी देखील जळगाव दुध संघापेक्षा कमी दराने दुध खरेदी केली होती. मात्र जळगाव दुध संघाने या काळात देखील दुध उत्पादकांच्या हितालाच प्राधान्य दिले आहे.

दुध संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी कृतीतून दिले उत्तर

जागतिक स्तरावर दुध भुकटी व लोण्याचे दर कमी झाल्याने त्याचा मोठा परिणाम दुध खरेदी दरावर होतो. राज्यातील सर्वच खाजगी व सहकारी दुध संघांनी आपले दुध खरेदी दर कमी केले होते. मात्र याचे देखील राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला. वास्तविक त्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील तर दूध संघ निवडणुकांच्या माध्यमातून दुध संघात सहभागी होणे हा पर्याय असतो. गेल्या 10 वर्षात दोन वेळा दुध संघाच्या निवडणुका झाल्या, आता दुध दरावर पत्रकार परिषदा घेणारे तेव्हा सक्रीय का नव्हते, मागील संचालक मंडळाच्या काळात तर बटर (लोणी) मध्ये कोट्यावधींचा अपहार झाला होता. तेव्हा देखील ही मंडळी शांत का होती, असा प्रश्न सर्वसामान्य दुध उत्पादक शेतकरी विचारत आहे. याउलट जळगाव दूध संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी विरोधात असताना दूध संघातील कोट्यावधींचा अपहार उघडकीस आणला. प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी होऊन संचालक मंडळात स्थान मिळवले व दूध संघाच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याचे काम केले. दूध दराच्या बाबतीत देखील त्यांनी बोलबच्चनगिरीला उत्तर न देता थेट कृतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. राज्यातील सर्वाधिक दुध खरेदी दर देण्याचा प्रयत्न केला आहे. संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, की “महाराष्ट्र व गुजरात राज्यातील सहकारी व खाजगी दूध संघांपेक्षा जास्त दर जळगाव दूध संघ देत आहे. संघाचा कारभार करताना गेल्या वर्षभरात अतिशय शिस्तीने व काटेकोरपणे पुढे जात आहोत. त्यामुळे संघाच्या अनावश्यक खर्चात कपात व नफ्यात वाढ होत आहे. याची चांगली फळे येणाऱ्या काळात सर्व दूध उत्पादकांना, संस्थाना चाखायला मिळतील, असा मला ठाम विश्वास आहे”.

महाराष्ट्र व गुजरात राज्यातील नामांकित संघांचे गायीचे दूध खरेदी दर –

● कात्रज दुध संघ (पुणे)- 26.00 रूपये
● संगमनेर दुध संघ (राजहंस ) – 27.00 रूपये
● गोदावरी संघ (कोपरगाव)- 27.00 रूपये
● महानंद दुध – 26.00 रूपये
● पंचमहल दुध – 25.50 रूपये
● भरूच दुध – 27.00 रूपये
● सुमूल दुध – 27.00 रूपये
● अमर दूध ( बोदवड )- 28.00 रूपये
● जळगाव दुध संघ (विकास)- 29.40 रूपये

दूध उत्पादक शेतकरी बांधवांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा शेतकरी दूध उत्पादकांचा संघ आहे. तो पारदर्शक व सुव्यवस्थित चालविण्याची आमची जबाबदारी असून त्यासाठी सर्व संचालक मंडळ कटिबद्ध आहे. जागतिक स्तरावर दूध भुकटी व लोणी याचे दर खालावल्याने काही काळ दूध खरेदी दरात कपात केली होती. मात्र दूध उत्पादकांचे हीत लक्षात घेता वरील दूध दरवाढ करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे.
-आमदार मंगेश चव्हाण, (चेअरमन- जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, मर्या.जळगाव)

WhatsApp Group

Related Articles

Back to top button