Jalgaon Gramin : टपरीवाला २३ तारखेनंतर तुम्हाला विधानसभेत दिसणार नाही…

-खा.संजय राऊत यांचा गुलाबराव देवकरांच्या सभेत घणाघात

Jalgaon Gramin : हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक टपरीवाल्यांना आमदार, खासदार व मंत्री केले. पण हा टपरीवाला शेवटी लायकीवरच गेला. त्याला घरी बसविण्याची वेळ आता आली असून २३ तारखेनंतर तो तुम्हाला विधानसभेत दिसणार नाही, अशी टीका शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी धरणगावात केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ धरणगावातील कोट बाजार भागात शिवसेना कार्यालयासमोर आयोजित जाहीर सभेत खा.राऊत यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारावर जोरदार टीका केली. पाणीपुरवठा खात्याचे मंत्री धरणगावकरांना पुरेसे पाणी देऊ शकत नाही. त्यांना दारूत टाकायला पाणी मिळते. लोकांना मात्र पाणी मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. त्यांनी धरणगावात उद्योग आणले नाही पण सट्टा, पत्ता, वाईन शॉप आणले. मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंचे पाय धरत होते, एका क्षणात सगळे विसरून सुरतमार्गे गुवाहाटीला पळून गेले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात निष्ठेच्या मोठ्या गप्पा मारायचे. या टपरीवाल्याला बाळासाहेबांनी मोठे केले म्हणून छाती ठोकून सांगायचे. आज गद्दारी केल्याने ते निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. त्यांना तोंड लपवत फिरावे लागत आहे, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

धरणगाव शहराचा कायापलट करणार : गुलाबराव देवकर

गेल्या १० वर्षात विकासाचे कोणतेही व्हीजन नसलेल्या नेतृत्वामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. धरणगावात २० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तरूणांच्या हाताला रोजगार नाही. अनेक बेरोजगार कामासाठी जळगावला जाताना दिसतात. अवैध धंद्यांना सगळीकडे ऊत आला आहे. बेसुमार वाळू उपाशामुळे नद्यांची पात्रे पोखरली गेली आहेत, याकडे लक्ष वेधून सेवेची संधी मिळाल्यास सर्वप्रथम धरणगाव शहराची पाणी टंचाई दूर केली जाईल. एखादा मोठा उद्योग आणून धरणगाव तालुक्याचा कायापलट केला जाईल, असे आश्वासन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिले.

यांची होती प्रमुख उपस्थिती

यावेळी उद्धव सेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, कृऊबासचे माजी सभापती लक्ष्मण पाटील (लकी टेलर), उपजिल्हा प्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, धरणगाव तालुका प्रमुख जयदीप पाटील, महिला तालुका प्रमुख जनाबाई पाटील, जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी व दीपक वाघमारे, उद्योजक सुरेश चौधरी, माजी जि.प.उपाध्यक्ष जानकीराम पाटील, संतोष सोनवणे, नाना ठाकरे, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक अध्यक्ष मनोज पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे धरणगाव शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button