Jalgaon Gramin : जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील नावाचे दोन उमेदवार, मतदारांमध्ये संभ्रम…?

Jalgaon Gramin : विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव रघुनाथ पाटील नावाच्या दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. सारख्याच नावाच्या एकापेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून माघारीच्या मुदतीत संबंधितांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी आता हालचाली सुरु झाल्या आहेत. राजकीय पक्षांना घाम फोडणाऱ्या अपक्ष उमेदवाराचा त्यामुळे भाव वाढल्याचे दिसून आले आहे.

Jalgaon Gramin: Two candidates named Gulabrao Patil in Jalgaon Gramin, confusion among voters…!

विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात जेमतेम १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मुकुंदा रोटे, बहुजन समाज पार्टीच्या अनिता कोळी, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण सपकाळे, हिंदुस्तान जनता पार्टीचे किशोर झोपे आदींचा समावेश आहे. याशिवाय अन्य नऊ उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत, ज्यामध्ये गुलाबराव रघुनाथ पाटील या नावाचा देखील समावेश आहे. शिंदे सेनेचे उमेदवार असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावाशी साधर्म्य बाळगून असलेले अपक्ष उमेदवार गुलाबराव पाटील हे शेवगे (ता.पारोळा) येथील रहिवाशी आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावाशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे त्यांचे नाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. शिंदे गटाची चिंता त्यामुळे वाढल्याचे बोलले जात आहे.

पाचोरा मतदारसंघातही सावळागोंधळ

पाचोरा मतदारसंघात शिवसेनेकडून (ठाकरे गट) माजी आमदार दिवंगत आर.ओ.पाटील यांच्या कन्या वैशाली नरेंद्रसिंह सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात वैशाली किरण सुर्यवंशी या नावाचा आणखी एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. याशिवाय भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल पंडितराव शिंदे यांनी बंडखोरी करून ठाकरे गटाच्या विरोधात अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्याही नावाच्या सारखेपणाचा फायदा घेऊन अमोल शांताराम शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.वैशाली किरण सुर्यवंशी यांच्या उमेदवारी अर्जाला ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली सुर्यवंशी यांनी तर अमोल शांताराम शिंदे यांच्या उमेदवारी अर्जाला भाजपचे अमोल पंडितराव शिंदे यांच्याकडून हरकत घेण्यात आली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या हरकती फेटाळून लावल्या होत्या.
मुक्ताईनगर मतदारसंघात देखील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा संभ्रम निर्माण करण्यासाठी चंद्रकांत निंबा पाटील (रा.डोंगरगाव, ता.शिंदखेडा) आणि चंद्रकांत निंबा पाटील (रा.खडके खुर्द, ता.एरंडोल) यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, मतदार यादीची प्रमाणित नक्कल छाननीच्या वेळी सादर न केल्याने दोघांचे अर्ज बाद ठरले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button