Jalgaon Gramin : आव्हाणे ते जळगाव रस्त्याची दयनीय अवस्था; केळी उत्पादक शेतकऱ्यांचे चिखलातच ठिय्या आंदोलन…!

Jalgaon Gramin : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील लोकप्रतिनिधींकडून विकासाचा दावा सातत्याने केला जात असला, तरी अजुनही बरीच गावे साध्या शेत रस्त्यांपासून वंचित असल्याचे दिसून आले आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावाचाही त्यात समावेश असून, नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी (ता.१५) थेट चिखलयुक्त रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.

Jalgaon Gramin : Pathetic condition of Avhane to Jalgaon old road; Banana farmers don’t have anyone…!

जळगाव तालुक्यात गिरणा नदीच्या काठावर वसलेल्या कानळदा, फुपनगरी, वडनगरी, खेडी, आव्हाणे गावांना जोडून पुढे जळगाव शहराकडे जाणारा मधला कमी अंतराचा रस्ता पूर्वापार अस्तित्वात आहे. पैकी आव्हाणे ते जळगाव दरम्यानच्या जुन्या रस्त्याची सध्याच्या घडीला खूपच वाईट अवस्था झालेली आहे. चिखलाच्या साम्राज्यामुळे जेमतेम अडीच किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरून हल्ली पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. बैलगाडी किंवा ट्रॅक्टर शेतापर्यंत पोहोचत नसल्याने परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हंगामावर लाखो रूपयांचे नुकसान त्यामुळे सोसावे लागले आहे.

लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

आव्हाणे ते जळगाव दरम्यानच्या जुन्या रस्त्यावर यापूर्वी दोनवेळा खडी टाकलेली असली तरी निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे ती आता दिसेनाशी झाली आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण व्हावे म्हणून शेतकरी जळगाव ग्रामीणच्या लोकप्रतिनिधींकडे मागील काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, संबंधितांकडून कोणतीच हालचाल आजतागायत झालेली नाही. याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून आव्हाणे येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी रविवारी जळगावकडे जाणाऱ्या जुन्या रस्त्यावर चिखलात बसून ठिय्या आंदोलन केले. त्यात रवींद्र पाटील, नामदेव पाटील, विजय पाटील, अशोकदादा पाटील, किसन चौधरी, प्रदीप पाटील, प्रल्हाद पाटील, पांडुरंग चौधरी, कालिदास सपकाळे, दीपक धनगर, शरद चौधरी, संदीप पाटील, ईश्वर पाटील, शंकर पाटील, शामराव पाटील, मुरलीधर सपकाळे आदी शेतकऱ्यांचा समावेश होता.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button