Jalgaon Gramin : मोठी बातमी; माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि भाजप नेते पी.सी.आबा पाटील पुन्हा आले एकत्र…!

Jalgaon Gramin : जळगाव ग्रामीण मतदारसंघात मागील काही पंचवार्षिकपासून शिवसेनेचा आमदार निवडून येत आहे. मात्र, भाजपने ठरवले तर शिवसेनेचा उमेदवार येथे विजयी किंवा पराभूत होऊ शकतो, भाजपचा इतका मोठा प्रभाव जळगाव ग्रामीणमध्ये अजुनही कायम असल्याचे बोलले जात आहे. सन २००९ च्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय देखील आला होता आणि राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर चुरशीच्या लढतीत विजयी झाले होते. त्या आठवणींना आज पुन्हा एकदा उजाळा मिळाला. निमित्त ठरला चावलखेडा (ता.धरणगाव) येथील नीळकंठेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा.

Jalgaon Gramin : Big News; Former minister Gulabrao Deokar and BJP leader PC Aba Patil together again…!

जळगाव ग्रामीण मतदारसंघात विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे आणि त्यास कारणीभूत ठरले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटात सामील झालेले गुलाबराव पाटील यांची पुन्हा एकदा जळगाव ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पाटील यांची लढत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकर यांचेशीच होणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. मात्र, गुलाबराव पाटील यांचे राजकीय भवितव्य यावेळी विशेषत: भाजपच्या पाठिंब्यावर अवलंबून असणार आहे. मंत्री पाटील यांना भाजपकडून किती मजबूत साथ मिळते, यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. कारण, मूळ शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पक्षाचे अनेक जुने पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले आहेत.

माजी मंत्री देवकर आणि पी.सी.आबांच्या एकत्र येण्याच्या चर्चेने उडाली खळबळ

दुसरीकडे गुलाबराव देवकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून, त्यांनी अनेक वर्षे जळगाव ग्रामीण मतदारसंघात काम केले आहे. त्यामुळे त्यांची जनतेत अजुनही चांगली पकड आहे. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात देवकर यांनीच शिवसेनेचे तत्कालीन आमदार गुलाबराव पाटील यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती असतानाही भाजपचे नेते पी.सी.आबा पाटील यांनी उघडपणे गुलाबराव देवकर यांना साथ दिल्याची चर्चा त्यावेळी होती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी गुलाबराव पाटील यांना पुन्हा आव्हान देण्याची तयारी चालवली आहे. तशात, माजी मंत्री देवकर आणि पी.सी.आबा पाटील यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेने आज पुन्हा सगळीकडे खळबळ उडवून दिली आहे.

महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे गुलाबराव देवकरांना होते खास आमंत्रण

धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथे नीळकंठेश्वर हायस्कुलच्या परिसरात पुरातन महादेव मंदिर असून, त्याठिकाणी जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच भंडाऱ्याचे आयोजन भाजपचे नेते, नीळकंठेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांनी केले होते. विशेष म्हणजे पी.सी.आबांनी माजी मंत्री गुलाबराव देवकरांना खास निमंत्रण त्यासाठी पाठवले होते. देवकर यांनीही त्याठिकाणी आवर्जून हजेरी लावली आणि भंडाऱ्यातील वरण-बट्टीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी पी.एम.पाटील यांचीही उपस्थिती होती, हे विशेष. याप्रसंगी पी.सी आबा आणि देवकर आप्पा यांच्यातील जुने मैत्रीपूर्ण संबंध अजुनही कायम असल्याचे पाहुन अनेकांना कौतूक वाटले. तर काहींच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, चावलखेड्यातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांना बोलावले होते. त्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, अशी प्रतिक्रिया पी.सी.आबा पाटील यांनी दिली.

WhatsApp Group

जितेंद्र पाटील (मुख्य संपादक)

गेल्या 24 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सकाळ-ॲग्रोवनमध्ये खान्देशातील बातमीदारीचा मोठा अनुभव. लोकसत्ता तसेच लोकमत, दिव्य मराठी वृत्तपत्रातही विपुल लिखाण केले आहे. प्रिंट मीडियासह यूट्युब, फेसबुक आणि आता वेब पोर्टलवर सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील. शेतीविषयी लिखाणात हातखंडा राहिला आहे. सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित.

Related Articles

Back to top button