चंद्रशेखर अत्तरदे पुन्हा फॉर्मात…जळगाव ग्रामीणमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांची वाढू शकते डोकेदुखी ?
जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वेध आता लागले आहेत. आपल्या जागा कशा वाढतील, त्यासाठी विविध पक्षांनी आतापासूनच राजकीय डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. जळगावमध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुक्ताईनगरचे शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात थेट उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर त्याचा प्रत्यय सुद्धा आला आहे. चंद्रशेखर अत्तरदे असे त्यांचे नाव असून, जळगाव ग्रामीणमध्ये गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत सध्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आव्हान दिल्याने ते चर्चेचा विषय ठरले होते. ( Jalgaon Gramin )
Jalgaon Gramin
भुसावळ तालुक्यात शेतजमीन विकसित करण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेली असतानाही मुक्ताईनगरचे शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व परवानग्या रद्द केल्या. याच कारणावरून भाजपचे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे आणि त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे हे दोघे दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला शिवसेना ठाकरे गटाने जाहीर पाठींबा सुद्धा दिला आहे.
अत्तरदे यांना भाजपचा छुपा पाठींबा ?
दरम्यान, पक्षाच्या एका विधानसभा क्षेत्रप्रमुखाने थेट मुख्यमंत्री व मुक्ताईनगरच्या आमदाराला दोषी ठरवत सपत्निक सुरू केलेल्या उपोषणाला थांबविण्याचा कोणताच प्रयत्न विशेषत्वाने भाजपाकडून आतापर्यंत झालेला नाही. तसेच कोणी नेता किंवा मोठ्या पदाधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट सुद्धा दिलेली नाही. अत्तरदेंच्या उपोषणामुळे सत्ताधारी पक्षाची मोठी मानहानी होत असताना, भाजपने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न देखील केलेला दिसत नाही. त्यामुळे चंद्रशेखर अत्तरदे यांच्या उपोषणाला भाजपचा तर छुपा पाठींबा नाही, अशी शंका जनसामान्यातून व्यक्त होऊ लागली आहे.
गुलाबराव पाटलांसाठी धोक्याची घंटा
सन २०१९ च्या निवडणुकीत काही कारणांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे मैदानाबाहेर राहिल्याने शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्यासाठी तेव्हाची निवडणूक अतिशय सोपी झाली होती. प्रत्यक्षात ऐनवेळी अपक्ष उमेदवारी दाखल करून चंद्रशेखर अत्तरदे यांनी गुलाबराव पाटलांना चांगलाच घाम फोडला होता. अपक्ष उमेदवार अत्तरदे हे भाजपने उभे केलेले डमी उमेदवार असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी त्यावेळी केला देखील होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रशेखर अत्तरदे आता पुन्हा चर्चेत आले आहेत. आपल्यावरील अन्यायाचा बदला घेण्यासाठी ते जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाला यंदाही आव्हान देऊ शकतात आणि त्यामुळे गुलाबराव पाटलांची डोकेदुखी वाढू शकते, अशी चर्चा त्यामुळे ऐकण्यास मिळाली आहे.