कोणी कितीही मारल्या विकासाच्या गप्पा…जनतेच्या मनात फक्त आहे देवकर अप्पा !
जळगाव टुडे । लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीला सुरूवात देखील झाली आहे. दरम्यान, विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा भावी आमदार कोण असेल, याविषयीचे जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न ‘जळगाव टुडे’ या न्यूज पोर्टलने फेसबुकच्या माध्यमातून केला. त्यास अतिशय जोरदार प्रतिसाद मिळाला असून, प्रतिक्रियांच्या माध्यमातून जनतेचा कौल सुद्धा जवळपास स्पष्ट झालेला आहे. ( Jalgaon Gramin )
विधानसभेचा जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा जळगाव तालुका व धरणगाव तालुका मिळून तयार झालेला आहे. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांचा आढावा घेतल्यानंतर या मतदारसंघात एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर आणि दोनदा शिवसेनेचे गुलाबराव पाटील निवडून आले आहेत. दरम्यान, गुलाबराव पाटील हे गेल्या १० वर्षांपासून जळगाव ग्रामीणचे आमदार आहेत. याशिवाय सध्या ते जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री देखील आहेत. अशा या परिस्थितीत विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीणमध्ये अर्थातच गुलाबराव देवकर आणि गुलाबराव पाटील या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच यंदाही थेट काट्याची लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
गुलाबराव देवकरांचे जनतेच्या मनावरील गारूड दहा वर्षानंतरही कायम असल्याची प्रचिती
विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीणमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने ‘जळगाव टुडे’ न्यूज पोर्टलने जनतेच्या मनातील आमदार नेमका कोण आहे, त्याचा कौल जाणून घेतला. तेव्हा फेसबुकवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडल्याचा अनुभव आला. सध्याच्या घडीला शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीणचे आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असले, तरी जनतेच्या मनावर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचेच गारूड कायम असल्याची प्रचिती एकूण प्रतिक्रियांवर आली आहे. गुलाबराव देवकर यांनी सुमारे १० वर्षांपूर्वी पायाभरणी केलेल्या धरणगावच्या रेल्वे उड्डाणपुलासह गिरणा नदीवरील दहीदुला ते गाढोदा पूल, बहिणाबाई स्मारक, बालकवी ठोंबरे स्मारक, म्हसावदचा रेल्वे उड्डाणपूल, जळगावच्या केळी संशोधन केंद्राची इमारत यासह अनेक कामांची आठवण मतदारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांना फेसबुकवरील प्रतिक्रियांच्या माध्यमातून करून दिली आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये परिवर्तनाची सूप्त लाट ?
मंत्री गुलाबराव पाटील हे गेल्या १० वर्षांपासून जळगाव ग्रामीणचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करीत आहेत. १० वर्षांच्या कालखंडात पाटलांनी विकासाची अनेक कामे केल्याचा दावा त्यांचे समर्थक ‘जळगाव टुडे’च्या फेसबुक पेजवर करतानाही दिसून आले आहेत. दुसरीकडे गुलाबराव देवकर समर्थकांनी गुलाबराव पाटील समर्थकांना दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरावरून जळगाव ग्रामीणमध्ये यंदा परिवर्तनाची सूप्त लाट असण्याच्या देखील तितकाच दुजोरा मिळाला आहे. एकूण सर्व प्रतिक्रियांवरून जळगाव ग्रामीणमधील आगामी निवडणूक विशेषतः मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी सोपी नसल्याचे संकेतही मिळाले आहेत.