लोकसभेच्या निकालानंतर…जळगाव जिल्ह्यात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता !

महाजन-खडसेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब ?

जळगाव टुडे । जिल्ह्यातील (Jalgaon District) जळगाव आणि रावेर मतदारसंघातील दोन्ही जागा महायुतीने प्रतिष्ठेच्या केल्यानंतर लोकसभेची निवडणूक अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडली आहे. आता प्रतिक्षा निकालाची असली तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व हे यापुढील काळात कोणाकडे असेल, त्यावर देखील शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. म्हणून लोकसभेच्या येत्या 04 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून म्हणजेच सन 2020 पासून जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे एकहाती नेतृत्व मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेच आहे. दरम्यान, खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करण्याची तयारी लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून चालवलेली असली तरी लोकसभेच्या जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा गिरीश महाजन यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या गेल्या आहेत. दुसरीकडे सून रक्षा खडसेंचा खुला प्रचार करता यावा म्हणून खडसेंनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला भेटून जाहीर पक्ष प्रवेशाचा प्रयत्न देखील करून पाहिला आहे, पण त्यांना ते अजुनही शक्य झाले नाही. कदाचित तुम्ही आधी रक्षा खडसेंना रावेरमधून मोठ्या मताधिक्याने निवडणून आणा; मगच तुमचा भाजप प्रवेशाचा विचार करू, असेही खडसेंना केंद्रीय नेतृत्वाकडून सांगितले गेले असावे. खरोखर तसे असेल तर रक्षा खडसे रावेरमधून निवडून आल्यानंतरच एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर होऊ शकणार आहे.

गिरीश महाजनांच्याही नेतृत्वाची कसोटी
एकनाथ खडसे किंवा दुसरा कोणी मोठा नेता पक्षात नसताना उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, धुळे आणि नंदुरबार त्याचप्रमाणे नाशिक, दिंडोरीच्या जागा मोठ्या फरकाने निवडून आणण्याचे आव्हान भाजप नेते गिरीश महाजन यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पेलले आहे. त्यातल्या त्यात जळगाव आणि रावेरच्या जागा सुमारे पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीवर शेतकऱ्यांचा रोष, मराठा समाजाची नाराजी आणि मुस्लीम मतदारांचा वाढलेला टक्का, या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव पडला आहे. उल्लेखनीय म्हणजे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी जळगाव आणि रावेर मतदारसंघाची निवडणूक नंतर खूपच चुरशीची ठरली असून, जळगावमध्ये खासदार उन्मेश पाटील यांनी ऐनवेळी बंड पुकारून भाजपच्या नाकात चांगलाच दम आणला होता. तर रावेरमध्ये उद्योजक श्रीराम पाटील यांच्यासारख्या मराठा उमेदवाराने सगळेच गणित बिघडवून टाकले होते.

गिरीश महाजनांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा हादरा बसण्याची चिन्हे ?
एकूण परिस्थिती लक्षात घेता लोकसभा निवडणूक निकालात फक्त रावेरची जागा चांगल्या मतांनी निवडून आली तरी एकनाथ खडसेंचा भाजपमधील प्रवेश म्हणजेच स्थान निश्चित होणार आहे. मात्र, जळगाव किंवा रावेरमधील दोन्ही जागा किंवा त्यापैकी एक जागा जरी हातून गेली तरी गिरीश महाजनांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे रावेरची जागा निवडून येणे जेवढे खडसेंच्या दृष्टीने महत्वाचे आहे, तितकेच जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा निवडून येणे हे मंत्री महाजन यांच्यासाठी महत्वाचे मानले जात आहे. लोकसभेच्या दोन्ही जागांच्या निकालावरच जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व एकनाथ खडसेंकडे असेल की गिरीश महाजनांकडे ? ते देखील पुढील काळात ठरणार आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button