लोकप्रतिनिधी निवडणुकीत मस्त अन् चाळीसगाव, अमळनेर तालुक्याचे ग्रामस्थ पाणी टंचाईग्रस्त !
जळगाव टुडे । जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सगळ्यात जास्त धुरळा कोणत्या तालुक्यांमध्ये उठला असेल तर तो चाळीसगाव आणि अमळनेर तालुक्यात. दोन्ही तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानंतर किमान दीड महिना तरी सर्वसामान्यांबद्दल कोणतेच सोयरसूतक बाळगलेले नव्हते. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील पाणी टंचाई वाढत्या उन्हाबरोबर आता तीव्र झाली असून, तहानेने व्याकूळ झालेल्या ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागले आहे. (Jalgaon District)
आधीच कमी पावसाळा त्यात वाढत्या तापमानामुळे होते नव्हते तेवढे जलसाठे आटल्याने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह अमळनेर तालुक्यांना मे महिन्यात भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. प्राप्त माहितीनुसार सध्याच्या घडीला चाळीसगाव तालुक्यातील 33 गावांना 46 टँकरद्वारे तसेच अमळनेर तालुक्यातील 20 गावांमध्ये 30 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दोन्ही तालुक्यातील जनता पाणीटंचाईने त्रस्त झाली असून लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने टंचाई निवारणार्थ उपाययोजनांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
या गावांना केला जातोय टँकरने पाणीपुरवठा
■ अमळनेर तालुका- तळवाडे, शिरसाळे बुद्रुक, निसरडी, लोन पंचम, नगाव बुद्रुक, शिरसाळे खुर्द, आर्डी, आनोरा, लोन बुद्रुक, सबगव्हान, नगाव खुर्द, देवगाव देवळी, भरवस, आंचलवाडी, आटाळे, पिंपळे खुर्द, चिमणपुरी, डांगर बुद्रुक, गलवाडे बुद्रुक, लोन चारम तांडा, पिंपळे बुद्रुक, जानवे , धानोरा, मंगरूळ, गलवाडे खुर्द, खडके, इंद्रापिंप्री, वाघोदे, कावपिंप्री, चोपडाई कोंडावळ.
■ चाळीसगाव तालुका- विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, कृष्णानगर, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राम्हणशेवगे, घोडेगाव, हातगाव भिल्लवस्ती, पिंप्री बुद्रुक, खराडी, डोणदिगर, तळेगाव, न्हावे, ढोमणे, पिंपळगाव, माळशेवगे, शिंदी, चतुर्भुज तांडा, शेवरी, बिलाखेड, शिरसगाव, जुनपाणी, पिंपळवाड निकुंभ, तळोदे प्र.दे., चिंचगव्हाण, अभोणे तांडा, सुंदरनगर, नाईकनगर तांडा, वाघळी.