भाजपच्या जळगाव आणि रावेरमधील लोकसभेच्या दोन्ही जागांना बसणार मोठा फटका ?

जळगाव टुडे । भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील जळगावसह रावेरच्या जागा लोकसभा निवडणुकीत प्रत्येकी पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात निवडणुकीतील एकूण चित्र लक्षात घेता भाजपच्या या दोन्ही जागांना यंदा खूप मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपने दोन्ही जागा जिंकल्या तरी जळगावची जागा फार तर दोन लाखांच्या लीडने आणि रावेरची जागा ही फार तर दीड लाखांच्या लीडने येऊ शकते, असे बोलले जात आहे. (Jalgaon District)

लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सट्टा बाजाराने कोणाला किती जागा मिळतील आणि आणि किती लीड घेईल, त्यासंदर्भात कौल दिला आहे. त्यानुसार देशभरात यंदा भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी होण्याची शक्यता सट्टा बाजाराने व्यक्त केली आहे. दरम्यान, जळगाव आणि रावेरच्या जागांसाठी सट्टा बाजाराने स्वतंत्र कौल दिलेला असला तरी दोन्ही जागा गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा यावेळी खूपच कमी मतांनी विजयी होतील, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, सट्टा बाजाराने जळगावच्या जागेसाठी महायुतीच्या उमेदवारावर 35 पैसे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारावर 55 पैशांचा भाव ठरवला आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार विजयी झाल्यास सट्टा लावणाऱ्याला 1 लाख 35 हजार रूपये मिळतील, तर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाल्यास सट्टा लावणाऱ्याला 1 लाख 55 हजार रूपये मिळतील. याशिवाय रावेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारावर 30 पैसे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारावर 45 पैशांचा भाव ठरला आहे. दोन्ही जागांचे रेट काढण्यासाठी सट्टा बाजाराने मतांची गोळाबेरीज करून सट्ट्याचा रेट ठरवल्याचे सांगितले जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button