भाजपासाठी धोक्याची घंटा…जळगाव शहर, चाळीसगाव, जामनेर, भुसावळ मतदारसंघातील मतदान घटण्याचे कारण काय ?

जळगाव टुडे । जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील अंतिम मतदान आकडेवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार, जळगाव शहर तसेच चाळीसगाव, भुसावळ आणि जामनेर मतदारसंघात प्रामुख्याने सर्वात कमी मतदान झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे या चारही विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व सध्या भारतीय जनता पार्टीचे आमदार करीत आहेत. पैकी जामनेर हा तर भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला मानला जातो. (Jalgaon District)

लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात जळगाव ग्रामीण तसेच एरंडोल आणि पाचोरा विधानसभा मतदारसंघ वगळता जळगाव शहर तसेच चाळीसगाव आणि अमळनेरमधील मतदानाची टक्केवारी फार समाधानकारक नाही. तसे पाहिले तर जळगाव ग्रामीण, एरंडोल आणि पाचोरा हे मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या ताब्यात आहेत. तर चाळीसगाव व जळगाव शहर हे दोन विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपा आमदारांच्या ताब्यात आहे. अमळनेर मतदारसंघातही सध्या महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांचे वर्चस्व आहे. दुसरी विशेष बाब म्हणजे अमळनेर ही भाजपाच्या उमेदवार श्रीमती स्मिता वाघ यांची कर्मभूमी आहे. यानंतरही जळगाव शहर, चाळीसगाव आणि अमळनेरमधील लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी ही जेमतेम 55 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. तुलनेत शिंदेसेनेचे वर्चस्व असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र मतदानाची टक्केवारी 60 टक्क्यांपर्यंत किंवा त्याच्या वर गेली आहे.

मुक्ताईनगरसह चोपडा विधानसभा मतदारसंघात जामनेरपेक्षा बरेच जास्त मतदान
लोकसभेच्या रावेर मतदारसंघातही रावेर, मुक्ताईनगर, मलकापूर, चोपडा विधानसभा मतदारसंघ वगळता भुसावळ आणि जामनेर मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीची मतदानाची टक्केवारी ही सर्वात कमी असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री व भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्या ताब्यात असलेल्या भुसावळमध्ये अतिशय कमी म्हणजे निच्चांकी 57.33 टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. याशिवाय भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात 60.18 टक्केच मतदान झाले आहे. तुलनेत ज्या ठिकाणी शिंदे सेनेचे आमदार आहेत, त्या मुक्ताईनगर आणि चोपडा मतदारसंघात जामनेरपेक्षा बरेच जास्त मतदान झाले आहे. आश्चर्य म्हणजे काँग्रेसचे शिरीष चौधरी आमदार असलेल्या रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 68 टक्क्यांपर्यंत गेली आहे. जळगाव जिल्ह्याशी फार संबंध नसलेल्या मलकापुरमध्येही 67.36 टक्के मतदान झाले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button