जळगाव जिल्ह्यातील मुस्लीम मतदारांनी भरवली राजकीय पक्षांच्या छातीत धडकी !

महायुतीसह महाविकास आघाडी पडली कोड्यात

जळगाव टुडे । लोकसभेच्या जळगाव आणि रावेर मतदारसंघात सोमवारी अतिशय चुरशीच्या वातावरणात निवडणूक पार पडली. प्राप्त माहितीनुसार, जळगाव मतदारसंघात एकूण सरासरी 57.70 टक्के आणि रावेर मतदारसंघात एकूण सरासरी 63.01 टक्के मतदान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, मुस्लीम मतदारांमधील अनपेक्षित उत्साह बघून महायुतीसह महाविकास आघाडी चांगलीच कोड्यात पडली आहे. मुस्लिमांचे हे वाढीव मतदान नेमके कोणाच्या फायद्याचे किंवा नुकसानीचे असेल, या विचाराने अनेकांची झोप देखील उडाली आहे. (Jalgaon District)

लोकसभेच्या जळगाव आणि रावेर मतदारसंघात सकाळी सातला मतदानाला सुरूवात झाल्यानंतर मतदान केंद्रांच्या बाहेर जेवढ्या काही रांगा लागल्या होत्या, त्यात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय होती. मुस्लीम महिला व पुरूष मतदारांमधील प्रचंड उत्साह बघून अनेकांना मोठा प्रश्न पडला. बहुतांश ठिकाणी सकाळपासून सायंकाळपासून मुस्लीम मतदारांची गर्दी कायम होती. पहिल्यांदाच असे हे अनपेक्षित चित्र पाहुन राजकीय पक्षांचेही डोके चक्रावले. मुस्लीम मतदारांनी मनापासून ठरविले तर यंदाच्या या निवडणुकीत काहीही होऊ शकते, या विचाराने अनेकांच्या छातीत त्यामुळे धडकी भरल्याशिवाय राहिली नाही.

मुस्लीम मतदारांवर कदाचित अवलंबून असेल लोकसभा उमेदवारांचा लीड
शेतकऱ्यांमधील रोष आणि मराठा समाजाची नाराजी, यामुळे आधीच जळगाव जिल्ह्यातील सत्ताधारी पक्ष धास्तावलेले होते. दोन्ही घटकांच्या नाराजीचा परिणाम लोकसभेच्या मतदानावर होण्याची भीती देखील संबंधित पक्षांचे नेते बाळगून होते. त्यात 100 टक्के मतदानाच्या इराद्याने झपाटलेल्या मुस्लीम समाजाने अचानक लोकसभा मतदानाची टक्केवारी वाढवून आधीच चिंतेत असलेल्यांना मोठा धक्का यावेळी दिला आहे. मुस्लिमांचे हे वाढलेले मतदान नेमके कोणाच्या बाजुने जाते, त्याचा अंदाज आताच व्यक्त करणे सोपे नसले तरी मुस्लिमांच्या मतांवर प्रामुख्याने महाविकास आघाडीसह महायुतीच्या लोकसभा उमेदवारांचा लीड हा अवलंबून असेल, असे जनसामान्यांमधून बोलले जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button