रोहिणी खडसे निष्प्रभ; श्रीराम पाटलांना मुक्ताईनगरची उमेदवारी देण्याच्या हालचाली ?

जळगाव टुडे | लोकसभेच्या निवडणुकीत रावेर (Raver) आणि जळगाव (Jalgaon) मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव केलेला असला, तरी पराभूत उमेदवारांनी मोठी मते मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, पराभूत उमेदवारांचा जनाधार लक्षात घेता विधानसभेच्या आगामी निवडणुकीत त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याच्या दृष्टीने विशेषतः शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून विचार केला जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

लोकसभेच्या रावेर मतदारसंघात बराच शोध घेऊनही चांगला तुल्यबळ उमेदवार सापडत नव्हता. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून उद्योजक श्रीराम पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी देऊन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी खेळी खेळली. उमेदवार पाटील यांच्यासाठी खुद्द शरद पवार यांनी चोपडा, भुसावळ, मुक्ताईनगर आणि जामनेरात जाहीर सभा घेतल्या. त्यामुळे श्रीराम पाटील यांच्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास चांगली चालना मिळाली. रावेरमधील मराठा व मुस्लीम मतदारांची मोठी संख्या लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीत श्रीराम पाटील हे भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना शंभर टक्के मात देतील, अशी शक्यता देखील त्यामुळे व्यक्त होऊ लागली होती. प्रत्यक्षात निवडणूक निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील हे रक्षा खडसे यांच्याकडून सुमारे 2 लाख 72 हजार मतांनी पराभूत झाले. अर्थात, त्यानंतरही श्रीराम पाटील यांनी दिलेली कडवी झुंज चर्चेचा विषय ठरली. कारण, रावेर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा एवढी जास्त मते पराभूत उमेदवाराला पहिल्यांदा पडली आहेत.

मुक्ताईनगरात तुतारीची झाली पिछेहाट
दरम्यान, लोकसभेच्या निकालानंतर कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मतदान झाले, त्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार रावेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात आणि रक्षा खडसे यांच्यात फक्त 36 हजार मतांचा फरक पडला आहे. कर्मभूमी असल्यानंतर रावेरमध्ये पाटील यांचा स्वतःचा प्रभाव देखील होता. त्यामुळे त्याठिकाणी त्यांनी चांगला लढा दिला. मात्र, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात श्रीराम पाटील आणि रक्षा खडसे यांच्यात जवळपास 47 हजार मतांचा फरक पडला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी स्वतःकडे जबाबदारी घेतल्यानंतर देखील मुक्ताईनगरात श्रीराम पाटील यांना चांगले मताधिक्य मिळू शकलेले नाही. भावजय रक्षा खडसे मैदानात असतानाही रोहिणी खडसे यांनी महाविकास आघाडीची धुरा हाती घेतली होती. प्रत्यक्षात मुक्ताईनगरात रक्षा खडसे याच वरचढ ठरल्या असून, रोहिणी खडसे निष्प्रभ ठरल्याने तिथे तुतारीची पिछेहाट झाली आहे.

शितावरून होऊ शकते भाताची परीक्षा….
विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागलेले असले तरी अजून त्यास थोडा वेळ आहे. परंतु, रोहिणी खडसे यांनी आपणच मुक्ताईनगरातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार राहणार असल्याचे यापूर्वीच घोषीत करून टाकले आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत चांगली भरीव कामगिरी करण्याची आणि पक्षात भक्कम स्थान निर्माण करण्याची मोठी संधी रोहिणी खडसे यांच्यासमोर होती. प्रत्यक्षात लोकसभेच्या निवडणुकीत मुक्ताईनगरात त्या आपला करिश्मा दाखवू शकलेल्या नाही. त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा करून त्यांच्याऐवजी थेट श्रीराम पाटलांना उमेदवारी देण्याचा विचार पक्ष श्रेष्ठींकडून केला जात असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीत कोणतीच जोखीम पत्करण्यास वरीष्ठ तयार नसल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगावमधील स्थानिक नेत्यांनी सुद्धा बोलून दाखवले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button