नव्या संघर्षाची नांदी…गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यामध्ये पुन्हा कुरघोडीचे राजकारण..!

जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा दारूण पराभव झाल्यानंतर त्यास राज्यातील भाजपचे नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यात भर भाजपच्या वाटेवर असलेले आमदार एकनाथ खडसे यांनीही महायुतीला आता घरचा आहेर दिला आहे. त्यांनी विशेषतः भाजप नेते गिरीश महाजन यांना लक्ष्य केले असून, उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या अपयशाचे खापर थेट महाजनांच्या डोक्यावर फोडले आहे. दोघांमधील वाद कमी होण्यापेक्षा उलट वाढतच चालल्याने ही नव्या संघर्षाची नांदी तर नाही, अशी शंका जनतेला साहजिक येऊ लागली आहे. (Jalgaon District)

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन सध्या भाजपच्या वाटेवर असलेले आमदार एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला बरेच दिवस झाले तरी अजून मुहुर्त मिळालेला नाही. भाजपमधील घरवापसीला स्थानिक नेत्यांचाच मोठा विरोध असल्याने खडसेंना बहुतेक ताटकळावे लागले आहे. असे असले तरी खडसेंनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजप उमेदवार सूनबाई रक्षा खडसे यांचा उघड प्रचार केला. त्यांच्याच प्रभावामुळे रक्षा खडसेंना रावेरमध्ये सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त मतांची आघाडी देखील मिळाली. परिणामी, आता तरी एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश मार्गी लागेल असे त्यांच्या समर्थकांना वाटू लागले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर मलाच आता भाजपमध्ये जाण्याची घाई नाही, असे खळबळजनक विधान करून खुद्द खडसेंनी अनेकांना संभ्रमात टाकले आहे.

कुठे गेले संकटमोचक गिरीश महाजन ?
सन 2019 च्या निवडणुकीत राज्यात भाजपचे 23 खासदार निवडून आले होते. यावेळेस मात्र भाजपचे अनेक खासदार पराभूत झाले असून, वाढत्या नाराजीमुळे राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात गेले आहे. अलिकडच्या काळात राज्यात निर्माण झालेले वातावरण लोकांना देखील आवडलेले नाही, असे बोलून एकनाथ खडसे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मोठा पराभव पत्कारावा लागल्यानंतर कुठे गेले संकटमोचक गिरीश महाजन ? असा सवाल देखील खडसेंनी उपस्थित केला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button