पारोळ्यात कापसाच्या कबड्डी वाणाची 1200 रूपयांना विक्री…गायत्री कृषी केंद्रावर कारवाई !
जळगाव टुडे । जिल्ह्यात ठराविक कंपनीच्या कापसाचे बियाणे जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा भरारी पथकाने म्हसावद (ता.जळगाव) येथे राशी कंपनीच्या 659 या वाणाची जादा दराने विक्री करताना विक्रेत्यास नुकतेच रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर आता पारोळा येथील गायत्री ऍग्रो एजन्सीज या कृषी केंद्रावर कापसाचे कबड्डी वाण 1200 रूपयांना विकले म्हणून कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. (Jalgaon District)
पारोळा शहरातील गायत्री ऍग्रो एजन्सीवर कापसाचे कबड्डी हे वाण ज्याची मूळ किंमत 864 आहे, ते 1200 रूपयांना विकले जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्याची खात्री करण्यासाठी भरारी पथकाने डमी ग्राहक पाठवून सदर कृषी केंद्र चालकाला जादा दराने कापसाचे बियाणे विकताना रंगेहाथ पकडले. दरम्यान, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या फिर्यादीवरून गायत्री ऍग्रो एजन्सीच्या संचालकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा अक्षिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कृषी अधिकारी सी.डी.साठे यांच्या भरारी पथकाने पारोळ्यातील कारवाई यशस्वी केली. शेतकऱ्यांनी जादा दराने बियाणे विक्री होत असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव, कृषी विकास अधिकारी जळगाव किंवा तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तक्रार करावी. याशिवाय शेतकरी बंधूंनी विशिष्ट वाणाची मागणी न करता विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेले मान्यताप्राप्त वाण हे संकरित BG 2 प्रकारातील असून योग्य पिक व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, किड रोग व्यवस्थापन व पाण्याचे नियोजन केल्यास चांगले उत्पादन येते. शेतकरी बंधूंनी गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन व सध्याचे तापमान पाहता कापूस पिकाची लागवड एक जून नंतरच करावी, असेही आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.