चक्रीवादळाने 1800 हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान, मंत्री गिरीश महाजन यांनी दिले ‘हे’ आदेश

जळगाव टुडे । जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात चक्रीवादळासह अवकाळी पावसाने जामनेर, रावेर, यावल, मुक्ताईनगर व जळगाव तालुक्यात सुमारे 1784 हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पैकी मुक्ताईनगर तालुक्यात सर्वाधिक 1 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पीक नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. (Jalgaon District)

बऱ्हाणपूर, रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव तालुक्यात वाढत्या तापमानामुळे आधीच केळीच्या बागा होरपळल्या होत्या. त्यातभर शनिवारी (ता.25) सायंकाळी अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे होत्या नव्हत्या त्या सर्व बागा उद्धवस्त झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित सर्व शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज देखील वर्तविला जात आहे. भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काही ठिकाणी प्रातिनिधीक भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीने आदेश दिले.

मंत्री महाजन यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील पातोंडी तसेच रावेर तालुक्यातील तांदलवाडी, जामनेर मतदारसंघातील देऊळगाव, तोरनाळा, पळासखेडा काकर, गोरनाळा येथे भेटी दिल्या. चक्रीवादळासह अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे, राहत्या घरांचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. केळीच्या बागा अक्षरशः झोपल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेली असून, पडझड देखील झाली आहे. याअनुषंगाने विशेषतः शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत. एकही बाधित शेतकरी सुटता कामा नये. नुकसानीचे पंचनामे करून सर्व बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याची कार्यवाही करावी, असेही आदेश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button