मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटलांच्या विरोधातील घोषणांनी दणाणले जिल्हाधिकारी कार्यालय !
जळगावमध्ये महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन
जळगाव टुडे । जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दूध, केळी, कापूस, ज्वारीच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज बुधवारी (ता.१०) सकाळी दहा वाजेपासून महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरूवात झाली. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. ( Jalgaon News )
Jalgaon News
गायीच्या दुधाला मंजूर केलेला ३० रूपये प्रति लिटरचा भाव आणि ५ रूपये प्रति लिटरचा भाव फरक तात्काळ सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत सादर न झालेल्या प्रस्तावांना देखील ५ रूपये प्रति लिटरचे अनुदान तात्काळ मंजूर करावे. तसेच जळगाव जिल्ह्यातील ६,६८६ केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई तातडीने मंजूर करावी. कापूस उत्पादकांना भावांतर योजनेचे अनुदान द्यावे. ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावी, आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीने हे आंदोलन पुकारले आहे. माजी खासदार उन्मेश पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले आहे.
माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वाल्मीक पाटील, मंगला पाटील, डॉ.अरूण पाटील, बापू परदेशी, नवल पाटील, अशोक सोनवणे, शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, विष्णू भंगाळे, गजानन मालपुरे, वैशाली सूर्यवंशी, लकी टेलर, शेतकरी संघटनेचे संदीप पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला गाडण्याचे आवाहन देखील केले.