जळगावमधील भाजपच्या ‘त्या’ सोईस्कर आंदोलनाची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर लक्ष्य !
जळगाव टुडे । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओबीसीमध्ये मुस्लिमांचा समावेश केल्याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने अनेक वर्गांचा ओबीसी दर्जा रद्द केला आहे. तर दुसरीकडे न्यायालयाच्या विरोधात ममता बॅनर्जी ह्या आता हायकोर्टात जाणार आहेत. त्यामुळे ममतांकडून कोर्टाचा अवमान होत असल्याचा आरोप करत भाजपा महानगर जिल्हा ओबीसी मोर्चातर्फे जळगावात नुकतीच जोरदार निदर्शने सुद्धा करण्यात आली. भाजपच्या याच आंदोलनाची सध्या सगळीकडे खिल्ली उडवली जात असून, सोशल मीडियावर त्यांना त्याकरीता लक्ष्य देखील करण्यात आले आहे. (Jalgaon BJP)
भाजपवरील टिकेला कारणीभूत ठरली रामदेववाडीतील अपघाताची घटना
एरवी जळगावमध्ये भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी तसेच ओबीसी मोर्चा आणि युवा मोर्चातर्फे विविध प्रश्नांना सामाजिक, राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किंवा कोणाचा तरी निषेध करण्यासाठी नेहमीच आंदोलने किंवा निदर्शने केली जातात. त्यामाध्यमातून थेट प्रशासनाचे म्हणण्यापेक्षा नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न प्रत्येकवेळी जास्तकरून केलाही जातो. बऱ्याचवेळा भाजपच्या आंदोलनांसह निदर्शनांचे जनतेकडून जाहीर कौतुकही केले जाते. परवा देखील जळगावमध्ये भाजपा महानगर जिल्हा ओबीसी मोर्चातर्फे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी त्यात बऱ्यापैकी सहभागी देखील होते. मात्र, यावेळी भाजपच्या नेहमी प्रमाणे झालेल्या निदर्शनाचे कौतूक कमी झाले आणि त्यावर टिकेची झोड जास्तकरून उठविण्यात आली. त्याला कारणीभूत ठरली जळगाव तालुक्यातील रामदेववाडीत घडलेली कार अपघातातील चौघांच्या मृत्युची दुर्घटना.
कोणत्याच राजकीय पक्षाने पोलिस प्रशासनाला साधा जाब विचारला नाही, कारण काय ?
रामदेववाडीतील अपघातात मातेसह तिची दोन चिमुरडी मुले आणि लहान भाच्याचा करूण अंत झाल्यानंतरही दोषींवर बरेच दिवस कोणतीच कारवाई झाली नाही म्हणून मृतांचे नातेवाईक संतप्त झाले होते. त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर देखील बहिष्कार टाकला होता. राजकारण्यांवर संशयितांना पाठीशी घातल्याचा आरोप करून पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर सुद्धा संशय घेण्यात आला होता. दरम्यान, अपघातानंतर तब्बल 17 दिवस उलटले तरी दोषींच्या विरोधात कोणतीच कारवाई झालेली नसताना, कोणत्याच राजकीय पक्षाने त्यासाठी पोलिस प्रशासनाला साधा जाब देखील विचारला नव्हता. त्यामुळे भाजपाने जशी तत्परता ममता बॅनर्जींच्या विरोधात निदर्शने करताना दाखवली, तशी रामदेववाडीच्या दुर्घटनेनंतर का दाखवली नाही, असा थेट सवाल सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेकजण आता विचारताना दिसत आहेत. भाजपच्या सोईस्कर आंदोलनावर सर्व घटकांमधून टीका देखील केली जात आहे.