जळगाव ते मुंबई विमानसेवेला सुद्धा मिळाला ग्रीन सिग्नल…लवकरच सुरूवात !

जळगाव टुडे । येथील विमानतळावरून गोवा, हैदराबाद आणि त्यानंतर पुण्यासाठी थेट विमाने उड्डाण घेऊ लागली आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नकाशावर जळगावचे नाव दिसू लागले आहे. दरम्यान, मुंबईसाठी सुद्धा स्वतंत्र विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळाल्याने जळगावच्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा आता खोवला जाणार आहे. जळगाव ते मुंबईची विमानसेवा लवकरच सुरू होणार असून, भारत सरकारच्या अलायन्स एअरलाईन्स कंपनीला त्यासाठीचा परवाना मिळाला आहे. (Jalgaon Airport)

जळगावहून मुंबईसाठी मागे विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव नंतर ती बंद पडली. मात्र, मोठ्या कालखंडानंतर आता पुन्हा मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. उडाण 5.0 योजनेंतर्गत गोवा तसेच हैदराबाद आणि पुणे शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेला मिळणारा अदभूत प्रतिसाद लक्षात घेता, जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यास भारत सरकारच्या अलायन्स एअरलाइन्स कंपनीने पाऊले उचलली आहेत. सदरची विमानसेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या तासाभरात जळगावकरांना मुंबई गाठता येणार आहे. (Jalgaon Airport)

मुंबईत मंत्रालयीन कामानिमित्त नियमितपणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या बरीच मोठी असते. याशिवाय व्यापार व उद्योग तसेच नोकरीच्या निमित्ताने अनेकजण मुंबईचा प्रवास करताना दिसून येतात. जळगावहून मुंबई जाण्यासाठी भरपूर रेल्वे गाड्या असतात. परंतु, त्यात गर्दीच्या हंगामात बऱ्याचवेळा जागा मिळत नाही. प्रवासात सहा ते सात तासांचा वेळ वाया जातो. त्यामुळे विमानसेवा सुरू झाल्यास जळगावकरांसाठी ती एक मोठी पर्वणी ठरणार आहे. तासाभराच्या प्रवासानंतर प्रत्येकाला मुंबई गाठता येणार आहे. फक्त मागील वेळी निर्माण झाली होती, तशी परिस्थिती आता निर्माण होऊ नये. त्याची काळजी सुरूवातीपासून घेतली गेली पाहिजे, अशी अपेक्षा प्रवाशी वर्गाने व्यक्त केली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button