विमानसेवेला ग्रीन सिग्नल….जळगावहून पुण्याला विमानाने पोहोचा आता फक्त सव्वातासात !
जळगाव टुडे । फ्लाय 91 कंपनीच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या जळगाव ते पुणे विमानसेवेला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. प्रायोगिक तत्त्वावर सदरची विमानसेवा 24 आणि 26 मे अशी दोनच दिवस चालवण्यात येणार असली तरी ती प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता पुढे ती नियमित केली जाऊ शकते. दरम्यान, जळगावहून पुण्याला फक्त सव्वातासात पोहोचता येणार असून, प्रवासभाडे साधारणपणे दोन हजार रूपयांपेक्षा कमीच असणार आहे. (Jalgaon Airport)
जळगावहून पुण्यासाठी 24 आणि 26 मे रोजी झेपावणाऱ्या विमानाची वेळ आणि तिकीट बुकींसाठीची अधिक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार जळगाव ते पुणे हे विमान दोन्ही दिवस दुपारी 02.10 मिनिटांनी उड्डाण घेईल आणि त्यानंतर सव्वातासांनी 03.25 मिनिटांनी पुण्यात उतरेल. परतीच्या प्रवासाला निघालेले विमान पुण्यात दुपारी 03.55 मिनिटांनी जळगावसाठी उड्डाण घेईल आणि सव्वातासांनी 05.20 मिनिटांनी जळगावला उतरेल.
रेल्वेसह खासगी बसने प्रवास केल्यानंतर जळगाव येथून पुण्याला जाण्यासाठी किमान आठ तास तरी लागतात. त्या तुलनेत विमानाने प्रवास केल्यानंतर जळगाव ते पुणे हे अंतर फक्त सव्वातासात पार करता येणार आहे. प्रवाशांचा त्यामुळे खूप मोठा वेळ वाचणार असून, नोकरी तसेच व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने नियमित पुणे ये-जा करणाऱ्यांना या विमानसेवेचा फायदा होऊ शकणार आहे. दरम्यान, सदरची विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरूवातीला दोनच दिवस सुरू राहणार असली तरी फ्लाइटची वारंवारता आणि कामकाजाचे दिवस हळूहळू वाढवले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.