जळगाव ते पुणे विमानसेवा केव्हा सुरू होणार ? महत्वाची माहिती आली समोर
जळगाव टुडे । जळगाव ते गोवा आणि हैदराबाद विमानसेवेला मिळत असलेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लक्षात घेता जळगाव ते पुणे विमानसेवा येत्या 25 मे पासून सुरू करण्याच्या दृष्टीने फ्लाय 91 कंपनीकडून हालचाली सुरू होत्या. त्यासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली असून, जळगावहून थेट पुण्याला विमानाने जाण्यासाठी आतूर असलेल्या प्रवाशांमध्येही त्याबद्दल मोठी उत्कंठा आहे. (Jalgaon Airport)
जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात प्रयत्नशील असलेल्या फ्लाय 91 कंपनीला पुण्यातील सैन्य दलाच्या ताब्यात असलेल्या विमानतळाकडून आवश्यक ती परवानगी देखील मिळाली आहे. त्यानुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साधारण 25 मे पासून जळगाव ते पुणे नियमित विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली करण्यात आल्या होत्या. मात्र, जळगाव विमानतळाला अद्याप पुणे विमानसेवेचे अधिकृत पत्र आणि उड्डाणाचे वेळापत्रक प्राप्त झालेले नाही. त्यामुळे फ्लाय 91 कंपनीने पुणे विमानतळासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्त अजुनही केलेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी किमान 15 दिवस तरी लागू शकतात. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस जळगावहून पुण्यासाठी विमानसेवा सुरु होणे तूर्त शक्य नसल्याचे दिसून आले आहे. फ्लाय 91 कंपनीचे सेल्स विभागाचे राष्ट्रीय प्रमुख नैमिश जोशी यांनीही त्यास दुजोरा दिला.
जळगाव शहर हे पुणे, हैदराबाद आणि गोव्याशी जोडण्यासाठी फ्लाय 91 कंपनीला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत परवाना देण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या तीन आठवड्यांपासून गोवा आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू असून, प्रवाशांचा मोठा प्रतिसाद त्यास मिळत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, येत्या 16 मे पासून जळगावहून गोव्यासाठी आता दररोज विमान झेपावणार असल्याची माहिती मिळाली आहे.