प्रवाशांसाठी खुशखबर…आता जळगावहून गोव्यासाठी दररोज झेपावणार विमान !

25 मे पासून पुण्यासाठीही विमानसेवा

Jalgaon Today : जळगाव शहर हे पुणे, हैदराबाद आणि गोव्याशी जोडण्यासाठी फ्लाय 91 कंपनीला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत परवाना देण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या 18 दिवसांपासून आठवड्यातून तीन दिवस गोवा आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू असून, प्रवाशांचा मोठा प्रतिसाद त्यास मिळत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, येत्या 16 मे पासून जळगावहून गोव्यासाठी आता दररोज विमान झेपावणार असल्याची माहिती मिळाली आहे. (Jalgaon Airport)

प्राप्त माहितीनुसार गोवा येथून निघालेले विमान दुपारी चार वाजता जळगाव येथील विमानतळावर दाखल होते आणि साडेचार वाजता हैदराबादकडे रवाना होत असते. हैदराबादला साडेसहा वाजता पोहोचलेले विमान अर्ध्या तासाने म्हणजेच सात वाजता जळगावसाठी उड्डाण घेते. रात्री साडेआठ वाजता जळगावला पोहोचलेले विमान पुन्हा रात्री नऊ वाजता गोवाकडे रवाना होते आणि 10.50 वाजता तिथे पोहोचते. आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच गुरूवारी, शनिवारी व सोमवारी प्रवाशांना या विमानसेवेचा लाभ घेता येत आहे.

25 मे पासून पुणे विमानसेवा सुरू होणार
गोवा आणि हैदराबादला मिळत असलेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लक्षात घेता जळगाव ते पुणे विमानसेवा येत्या 25 मे पासून सुरू करण्याच्या दृष्टीने फ्लाय 91 कडून हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे जळगाव ते पुणे विमानसेवा दररोज सुरू राहणार असून, त्याचा लाभ जळगाव शहर व जिल्ह्यातील प्रवाशांना घेता येणार आहे. हैदराबाद, गोवा आणि पुण्यासाठी दररोज विमानसेवा सुरु झाल्यानंतर जळगावच्या विकासाला आणखी मोठा हातभार लागू शकणार आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button