Jalgaon Airport : खुशखबर; जळगावहून पुण्यासाठी दररोज विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली !
Jalgaon Airport : फ्लाय ९१ कंपनीच्या माध्यमातून गोवा-जळगाव-पुणे विमानसेवा सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता जळगाव ते पुणे विमानसेवेची वारंवारता आता वाढविण्यात येणार असून, जळगावहून पुण्यासाठी दररोज विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. नोकरी, शिक्षण तसेच व्यवसायानिमित्त पुणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची खूप मोठी त्यामुळे होऊ शकणार आहे.
Jalgaon Airport : Good news; Movement to start daily flight service from Jalgaon to Pune!
गेल्या २७ मे पासून जळगावहून पुण्याला आठवड्यातून चार दिवस नियमित विमान झेपावत आहे. गोवा-जळगाव-पुणे विमानसेवा सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी आता उलटला आहे. याशिवाय गोवा-हैदराबाद-जळगाव ही नियमित विमानसेवा यापूर्वीच सुरू आहे. त्यानंतर आता मुंबईसाठीही विमान सेवा सुरू झाली आहे. यामुळे खासगी बसेस आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमी वेळात मुंबई, पुणे, गोवा व हैदराबादला सहज पोहोचणे शक्य झाले आहे. पुण्यात नुकत्याच सुरू झालेल्या कमर्शियल टर्मिनसमुळे गोवा-जळगाव-पुणे विमानसेवेची वारंवारता वाढण्याचीही शक्यता आहे. जळगाव ते पुणे विमानसेवा दररोज झाल्यास प्रवाशांचे खासगी बसेस तसेच रेल्वेवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
पुणे फ्लाईट दिवसातून दोनवेळा असावी
गोवा-जळगाव-पुणे विमानसेवेला प्रवाशांचा खूप मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता गोवा-जळगाव-पुणे विमानसेवा दररोज देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने विमानतळावरील स्लॉट मिळविण्याच्या हालचाली देखील सुरू आहेत, अशी माहिती फ्लाय ९१ कंपनीचे व्यवसाय प्रतिनिधी नैमिष जोशी यांनी दिली आहे. दरम्यान, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता जळगाव ते पुणे फ्लाईट दिवसातून दोनवेळा असावी, अशी अपेक्षा कॅटचे राज्य उपाध्यक्ष पुरूषोत्तम टावरी यांनीही व्यक्त केली आहे.