खुशखबर, जळगाव ते मुंबई विमानसेवेच्या तिकीट दरात ‘इतकी’ झाली कपात !

वेळापत्रकातही करण्यात आली सुधारणा

जळगाव टुडे । थेट मुंबईसाठी जळगाव येथून आज गुरुवार (ता.२०) पासून स्वतंत्र विमानसेवा सुरू होत आहे. दरम्यान, जळगाव ते मुंबई विमानसेवेसाठी आधी ३४४० रूपये तिकीट दर निश्चित करण्यात आला होता. मात्र, त्यामुळे प्रवासीवर्गातून मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तिकीट बुकींगला देखील अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. संबंधित विमान कंपनीने प्रवाशांच्या नाराजीची दखल घेत मुंबईच्या प्रवासभाड्यात अखेर भरघोस कपात जाहीर केली आहे. ( Jalgaon Airport )

गोवा, हैदराबाद तसेच पुणे शहरांसाठी जळगाव येथून सुरू झालेल्या विमानसेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता मुंबईसाठी अलायन्स एअर कंपनीच्या माध्यमातून नव्याने विमानसेवा सुरू होत आहे. प्राप्त माहितीनुसार, जळगाव ते मुंबई विमानसेवा आधीच्या नियोजनानुसार आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहणार होती. तसेच तिकीट दर हा सुमारे ३४४० रूपये जाहीर करण्यात आला होता. त्याबद्दल व्यापारी व प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर उमटल्यानंतर अखेर जळगाव ते मुंबई विमानसेवा आता आठवड्यातून दोन नव्हे तर तीन दिवस मंगळवार, गुरूवार आणि शुक्रवारी सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे विमानाचा तिकीट दर हा फक्त २१०० रूपये असणार आहे. तब्बल १३४० रूपयांची मोठी कपात विमानाच्या तिकीटात आता करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विमानसेवेच्या वेळापत्रकातही काही चांगली सुधारणा केली गेली आहे.

जळगाव-मुंबई विमानसेवेचे असे आहे वेळापत्रक
मंगळवारी सायंकाळी ०६.३५ वाजता मुंबईहून विमान निघेल आणि रात्री ०७.५५ वाजता जळगावला पोहोचेल. जळगावहून रात्री ०८.२० मिनिटांनी विमान मुंबईला निघेल आणि ०९.३५ ला पोहोचेल. गुरुवारी व शुक्रवारी विमान मुंबईवरून सायंकाळी ०६.४५ वाजता जळगावकडे निघेल आणि जळगावला रात्री ०८.०५ ला पोहोचेल. त्यानंतर रात्री ०८.३० वाजता मुंबईकडे विमान झेपावेल आणि ०९.४५ वाजता मुंबईला पोहोचेल.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button