जळगावहून ‘या’ तारखेला सुरू होणार गोवा, हैदराबाद, पुण्यासाठी विमानसेवा
Jalgaon Airport : भारत सरकार नागरी विमान वाहतूक मंत्रालय अंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) यांच्याकडून Fly 91 कंपनीला सर्व परवानग्या मिळाल्या असून, डिजीसीएकडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC)देखील बहाल करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या 08 एप्रिलपासून जळगाव येथून गोवा तसेच हैदराबादसाठी आणि 01 मेपासून पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
खासदार उन्मेश पाटील यांनी ‘डीजीसीए’चे चेअरमन विक्रम दत्त आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन जळगाव येथून पुणे तसेच हैदराबाद व गोव्यासाठी विमानसेवा सुरू करण्याच्या उद्देशाने पाठपुरावा केला होता. त्यानुसार Fly 91 ला जळगाव शहर पुणे, हैदराबाद आणि गोव्याशी जोडण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत परवाना देण्यात आला आहे. फ्लॉय 91 विमान कंपनीला गोवा, हैदराबाद तसेच पुणे विमानतळावरून मिळालेल्या स्लॉटनुसार विमानसेवेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसारच जळगाव विमानतळ विभागाकडून देखील उड्डाण परवाना देण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार सदर विमानसेवेचे वेळापत्रक अंतिम मंजुरीसाठी ‘डीजीसीए’कडे पाठविण्यात आले आहे. तिकडून ग्रीन सिग्नल मिळताच प्रत्यक्ष विमानसेवेला ठरल्याप्रमाणे सुरूवात होणार आहे.
विमानसेवेचे वेळापत्रक असे राहील
08 ते 30 एप्रिलच्या कालावधीत गोव्यावरून निघालेल्या विमानाचे सकाळी 08.55 वाजता जळगाव विमानतळावर आगमन होईल आणि हैदराबादला सकाळी 09.25 वाजता रवाना जाईल. हैदराबादवरून दुपारी 01.25 वाजता जळगाव विमानतळावर आगमन होईल, तर गोव्याला 01.55 वाजता उड्डाण करेल. याशिवाय 01 मे ते 26 ऑक्टोबरच्या कालावधीत गोव्यावरून दुपारी 04.05 वाजता जळगावला विमान येईल, तर दुपारी 04.35 वाजता हैदराबादला रवाना होईल. हैदराबादवरून रात्री 08.35 वाजता विमान जळगावला येईल, तर रात्री 09.05 वाजता गोव्याला रवाना होईल. तसेच 01 मेपासून पुण्यावरून सायंकाळी 06.30 वाजता जळगावला विमान येईल, तर सायंकाळी 07.20 वाजता पुण्याला विमान रवाना होईल. प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी ‘फ्लॉय 91’ कंपनीच्या अधिकृत वेबासाइटवर तसेच जळगाव विमानतळावर देखील तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.