जैन इरिगेशनचा क्रिकेट संघ अंतिम विजेता, मुंबईच्या टाईमशील्ड स्पर्धेच्या ‘अ’ गटात अव्वल

मुंबई कस्टम्स संघावर केली मात

Jain Irrigation : मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित आंतरकार्यालयीन ‘अ’ गट स्पर्धेचा अंतिम सामना जळगावचे जैन इरिगेशन विरूद्ध मुंबई कस्टम्स यांच्या दरम्यान 27, 28, 29 मार्च रोजी मुंबईतील बांद्र-कुर्ला संकुलाच्या मैदानावर खेळला गेला. मुंबई कस्टम्स संघाने आपला पराभव मान्य करीत सदरचा अंतिम सामना जैन इरिगेशनच्या संघाला बहाल केला.

मुंबई कस्टम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या कर्णधाराचा निर्णय सुयोग्य ठरवताना मुंबई कस्टम संघाने अप्रतिम गोलंदाजी करीत जैन इरिगेशन संघाला 145 धावांत रोखले. यात जयस्वाल याने 40 धावात 5 बळी घेतले तर चव्हाण याने 32 धावात 4 बळी घेतले. जैन संघाचा आघाडीचा फलंदाज शाश्वत जगताप याने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्यासोबत राॅयस्टन डायस याने 21 धावांचे योगदान दिले.

145 धावांचा पाठलाग करणारा मुंबई कस्टम संघ फलंदाजीत विशेष चमक दाखवू शकला नाही. जैन संघातील जळगावचा खेळाडू शशांक अत्तरदे याने अत्यंत भेदक अशी ऑफस्पीन गोलंदाजी करताना मुंबई कस्टम संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडीत केवळ 37 धावांत 7 बळी मिळविल्या. तर जळगावच्याच जगदिश झोपे याने सुद्धा 2 महत्त्वपुर्ण बळी मिळवीत शशांक याला उत्तम साथ दिली व मुंबई कस्टम संघाला 125 धावांवर गुंडाळून 20 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. आपल्या दुसऱ्या डावात फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत जैन संघाचा कर्णधार जय बिस्टा याने नाबाद 201 धावा केल्या. तर सुवेद पारकर याने 112 धावांचे योगदान दिले. जैन इरिगेशन संघाने एकुण 3 बाद 379 धावांवर आपला डाव घोषित केला.

जैन इरिगेशन कंपनी भविष्यात देखील खेळाडूंच्या उन्नतीसाठी कटिबद्ध राहील

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. या कंपनीने खेळाडूंना सदैव पाठबळ देण्याचे धोरण राबविले आहे. क्रीडापटुंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी कंपनीद्वारे अनेक वर्षांपासून आपला क्रिकेट संघ मुंबईतच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘टाईमशील्ड’ या आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत 2010 पासून सातत्याने सहभागी होत आहे. मागील काही वर्षांपासून या संघाचा समावेश ‘अ’ गटात झालेला आहे. आजपावेतो या संघाने सन 2014 आणि आता 2024 मध्ये ‘अ’ गटाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवित दुसऱ्यांदा टाईमशील्ड चषक आपल्या नावे केला आहे. संघातील सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन करताना विशेष अभिमान व आनंद वाटत आहे. आमची कंपनी सर्वच प्रकारच्या खेळांना व खेळाडूंना आपला सक्रिय पाठिंबा देत आली आहे व भविष्यात देखील खेळाडूंच्या उन्नतीसाठी कटिबद्ध राहू याची ग्वाही पण या विशेष प्रसंगी देतो, अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी दिली.

जैन इरिगेशनचा विजेता संघ पुढीलप्रमाणे

1) जय बिस्टा 2) शाश्वत जगताप 3) मनन भट 4) सुवेद पारकर 5) आयुष झिमरे 6) साईराज पाटील
7) राॅयस्टन डायस 8) विजय गोयील (सर्व मुंबई) 9) सुरज शिंदे (पुणे) 10) शशांक अत्तरदे 11) जगदिश झोपे (जळगाव)
प्रशिक्षक- 1) समद फल्ला (पुणे) 2) अनंत तांबवेकर (सांगली)
मार्गदर्शक- मयंक पारिख (मुंबई)

WhatsApp Group

Related Articles

Back to top button