जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांसाठी 07 मार्चला गुंतवणूक परिषदेचे आयोजन
Investment Council : जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासह उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्याकरीता हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, एमआयडीसी पोलीस स्टेशनजवळ, जळगाव येथे गुरुवारी (ता. 07 मार्च) जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
गुंतवणूक परिषेदला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे मार्गदर्शन करणार आहेत. गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्र असलेल्या कृषी आधारित उद्योगांमध्ये तसेच इतर उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या उद्योगांना गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी एक खिडकी योजना प्रस्तावित असून सेवा, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक प्रकल्प आदी पायाभूत सुविधा देण्याबाबत तसेच गुंतवणुकदारांना उद्योगांसाठी लागणार विविध परवाने, अनुदान आदी अनुषंगिक बाबी उद्योगास प्राधान्याने दिल्या जाणार आहेत. या परिषेदेत औद्योगिक संघटना, उद्योजक, औद्योगिक समुह, सनदी लेखापाल, उद्योग व्यवसायाशी संबंधीत शासकीय विभाग यांनी परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्रांच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.