चाळीसगाव स्थानकावर मंगळवारी रेल्वेचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक, दोन दिवस 10 गाड्या रद्द
भुसावळ ते देवळाली-इगतपुरी मेमूचा समावेश
Indian Railway : भुसावळ विभागातील चाळीसगाव स्थानकावर मंगळवारी (ता.16) ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे दोन दिवस तब्बल 10 गाड्या रद्द राहणार असून, आठ गाड्या त्यांच्या निर्धारीत वेळेपेक्षा उशिरा धावणार आहे. याशिवाय पाच गाड्यांच्या मार्गात बदल केला जाणार आहे, ज्या जळगाव स्थानकावरून उधना, वसई रोड, दिवा स्थानकमार्गे वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी दोन्ही दिवस रेल्वे प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी माहिती घेऊनच घराबाहेर पडावे.
मध्य रेल्वेच्या चाळीसगाव स्थानकावर यार्ड री मॉडेलिंगच्या कामासाठी 16 एप्रिल रोजी सकाळी सात ते दुपारी 12.30 वाजेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे दोन्ही बाजुच्या गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होणार आहे. त्यानुसार डाऊन मार्गावरील गोवा एक्सप्रेस दीड तास, साईनगर शिर्डी ते कालका एक्सप्रेस 15 मिनिटे, एलटीटी ते गोड्डा एक्सप्रेस 20 मिनिटे, मुंबई ते लखनऊ एक्सप्रेस 15 मिनिटे, जम्मूतवी ते पुणे झेलम एक्सप्रेस सव्वाचार तास, गोरखपूर ते एलटीटी एक्सप्रेस पावणेदोन तास, दिब्रुगड ते एलटीटी एक्सप्रेसला पावणेदोन थांबविले जाईल, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
या रेल्वे गाड्या मंगळवारी रद्द
दरम्यान, देवळाली ते भुसावळ तसेच भुसावळ ते देवळाली मेमू, भुसावळ ते इगतपुरी तसेच इगतपुरी ते भुसावळ मेमू, बडनेरा ते नाशिक तसेच नाशिक ते बडनेरा मेमू, मुंबई ते धुळे एक्सप्रेस तसेच धुळे ते मुंबई एक्सप्रेस या गाड्या मंगळवारी (ता.16) रद्द असतील, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी रेल्वेशी संपर्क साधावा.