सावधान… RPF भरतीची जाहिरात निघाली आहे बनावट, रेल्वे मंत्रालयाचा मोठा खुलासा
Indian Railway : RPF अर्थात रेल्वे सुरक्षा दलामध्ये हवालदार आणि पोलिस उपनिरिक्षकांची पदे भरण्याबाबतची जाहिरात RTUEXAM.NET या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली होती. सदरची पूर्णतः बातमी बनावट असल्याचा खुलासा रेल्वे मंत्रालयाने केला आहे. तसेच भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे निवेदन प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून रेल्वे सुरक्षा दलाने प्रसिद्ध केलेले नाही, अशी अधिकृत माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून एरवी अनेकजण फसवणूक करताना दिसून येतात. त्यापुढे जाऊन आता संकेतस्थळाच्या माध्यमातून बेरोजगार तरूणांना जाळ्यात ओढण्याचे काम केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. रेल्वे सुरक्षा दलामध्ये हवालदार आणि पोलिस उपनिरिक्षकांची पदे भरण्याबाबतची अशीच एक जाहिरातवजा बातमी RTUEXAM.NET या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली होती. सुदैवाने त्याकडे रेल्वे सुरक्षा बलाचे वेळीच लक्ष गेले. त्यामुळे RPF भरतीच्या आशेने गंडविल्या जाणाऱ्या हजारो तरूणांची फसवणूक थांबली. बेरोजगार तरूणांनी असल्या बोगस प्रकरणांपासून सावध राहावे. शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही भरतीसाठी अर्ज करू नये, असे आवाहन रेल्वे मंत्रालयाने केले आहे.