Narendra Modi : ‘मी जळगावला येण्यासाठी उत्सुक आहे’, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून केलेले ट्विट चर्चेत…!
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारी (ता.२५) दुपारी जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, जळगावच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मी जळगावला येण्यासाठी उत्सुक आहे’, असे ट्विट त्यांनी खास मराठीतून केले आहे, ज्याची सगळीकडे चर्चा देखील आहे.
Narendra Modi: ‘I am eager to come to Jalgaon’, Prime Minister Narendra Modi’s tweet in Marathi is in discussion…!
जळगावमधील कार्यक्रमात केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेंतर्गत ११ लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. याशिवाय बचत गटांसोबत काम करणाऱ्या महिलांना लाभ देण्यासाठी २५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी लखपती दीदी योजनेच्या लाभार्थी महिलांशी संवाद सुद्धा साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा महत्त्वाचा दौरा आहे. यापूर्वी त्यांनी मुंबईला भेट दिली होती, जिथे त्यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन करून नवीन योजनांचा शुभारंभ केला होता. त्यांचे महाराष्ट्रातील दौरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहेत. विधानसभा निवडणूक जवळ येत असताना, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांनी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
पंतप्रधानांकडून महाराष्ट्रासाठी नव्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावमधील कार्यक्रमातील उपस्थिती देखील महायुतीकडून विधानसभा काबीज करण्याच्या प्रयत्नाचाच एक भाग आहे. त्यामुळे ते जळगावच्या या दौऱ्यात काय मुद्दे मांडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. पंतप्रधान मोदी जळगावमधील आपल्या भाषणात विकासाच्या मुद्द्यांवर भर देतील, अशी शक्यता आहे. केंद्र सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेत महाराष्ट्रासाठी नव्या योजनांची त्यांच्याकडून घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या भाषणात ते विरोधकांवर टीका करतील का आणि राज्यातील राजकीय समीकरणांवर काय भाष्य करतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या दौऱ्यातून आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीच्या रणनीतीला दिशा मिळण्याची शक्यता आहे.