नशिराबादमध्ये घडले विपरीत…मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा हादरा !
जळगाव टुडे | लोकसभेच्या निवडणुकीत स्मिता वाघ ह्या सुमारे अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून आल्या असून, त्यांना एकट्या जळगाव ग्रामीणने सुमारे 63 हजार मतांचा लीड दिला आहे. त्यामुळे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेत खूपच उत्साह संचारला आहे. दलित व मुस्लीम मतांचा फटका बसल्यानंतर देखील आपल्याला मोठी आघाडी मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत आहे. मात्र, जळगाव ग्रामीणमध्ये अशी काही गावे पण आहेत, ज्यांनी महायुतीला लोकसभेच्या निवडणुकीत यंदा मोठा हादरा दिल्याचे दिसून आले आहे. (Gulabrao Patil)
लोकसभेच्या निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील बहुतांश बूथवर महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनीच आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. अर्थात, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रभावाखाली असलेल्या गावांचा त्यात वाटा राहिला आहे. तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्चस्व असलेल्या धरणगाव शहराचे त्यात मोठे योगदान आहे, हे कोणीच नाकारणार नाही. दरम्यान, महायुतीच्या घटकपक्षांनी युती धर्म निभावल्यामुळेच भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना जळगाव व धरणगाव तालुक्यात मोठा लीड मिळाल्याचा दावा विशेषतः शिंदे सेनेतर्फे केला जात आहे. वास्तविक जळगाव ग्रामीणमधील जवळपास 30 बूथ असे आहेत, जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांनाच सर्वाधिक मतदान झाले आहे आणि त्यामुळेच मंत्री गुलाबराव पाटील यांचे टेंशन आता वाढले आहे.
नशिराबादमध्ये मशाल धगधगली…
जळगाव ग्रामीणमध्ये धरणगावसह नशिराबाद ही सर्वाधिक मतदारसंख्येची दोन मोठी शहरे आहेत. दोन्ही ठिकाणची मते कोणत्याही निवडणुकीत निर्णायक ठरत असल्याने राजकीय पक्षांचे सर्वाधिक लक्ष हे धरणगाव आणि नशिराबादकडेच असते. त्याचा प्रत्यय यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही आला होता. प्रत्यक्षात नशिराबादच्या मतदारांनी महायुतीला यंदा चांगलाच हादरा दिला असून, 25 पैकी 10 बूथवर महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील हे आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ ह्या 15 बूथवर पुढे राहिलेल्या असल्या तरी, त्यांना करण पाटलांपेक्षा फक्त 723 मते जास्त पडली आहेत. नशिराबादमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील यांना एकूण 6464 मते तर भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना एकूण 7187 मते मिळाली आहेत.
धरणगाव, शिरसोलीतही कमळाला झटका…
याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील यांना धरणगावातील 07, शिरसोलीतील 03, पाळधीतील 01, विटनेरमधील 01, बिलवाडीतील 01, मन्यारखेड्यातील 01, डोमगावातील 01, सुभाषवाडीतील 01, अंजनविहिरेतील 01 आणि जांभोऱ्यातील 01 बूथवर स्मिता वाघ यांच्यापेक्षा जास्त मतदान झाल्याचे दिसून आले आहे.