मंत्री गुलाबराव पाटलांची चिंता वाढली; ‘या’ गोष्टीचा घेतला मोठा धसका !
जळगाव टुडे | लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी जळगाव आणि रावेर मतदारसंघात महायुतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप, शिंदे सेना व अजित पवार राष्ट्रवादीचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. नेत्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये तर विजयाचे श्रेय घेण्यासाठी सध्या चढाओढच सुरू आहे. त्यात मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे सध्या सर्वात पुढे असल्याचे दिसून आले आहेत.
लोकसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जळगाव मतदारसंघात भाजप प्रणित महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ ह्या सुमारे 2 लाख 51हजार 594 मतांनी विजयी झाल्या असून, त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील-पवार यांचा पराभव केला आहे. प्राप्त माहितीनुसार खासदार वाघ यांनी चाळीसगाव, पाचोरा आणि एरंडोल विधानसभा मतदारसंघ वगळता जळगाव शहर, जळगाव ग्रामीण तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी घेतली आहे. त्यातल्या त्यात अमळनेर तालुक्यात त्यांना सर्वाधिक 71 हजाराचे तर जळगाव ग्रामीणमध्ये 63 हजार आणि जळगाव शहरात 61 हजाराचे मताधिक्य मिळाले आहे.
स्वतःची पाठ थोपटून घेण्यात धन्यता…
दरम्यान, खासदार स्मिता वाघ यांना जळगाव ग्रामीणमध्ये सुमारे 63 हजार मतांची आघाडी दिल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील हे स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेताना दिसून येत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीतही महायुतीचा दबदबा कायम राहिल, अशी आशा त्यांना आता वाटू लागली आहे. जळगाव ग्रामीणमधून मोठ्या मतांनी विजयी होण्याचे स्वप्न देखील ते त्यामुळे पाहु लागले आहेत. गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासाच्या कामांमुळे आपण जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा मोठा कायापालट केलेला असल्याने विरोधक आपल्यासमोर टिकूच शकणार नाही, असेही त्यांना वाटते आहे.
मुस्लीम व दलित मतदारांनी वाढवले टेंशन…
मंत्री गुलाबराव पाटील हे लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत होण्याची अपेक्षा बाळगत असले तरी, मुस्लीम आणि दलित मतदारांच्या बाबतीत मात्र अलिकडे ते खूपच धास्तावल्याचे जाणवू लागले आहे. पाळधी (ता.धरणगाव) येथे पाच जून रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलतानाही त्याची प्रचिती आली. लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लीम व दलित मते मिळालेली नसली तरी शिंदे सेनेचे जे सात खासदार राज्यात निवडून आले आणि ते सर्व प्युअर मतांनी निवडलेले खासदार असल्याचेही त्यांनी म्हटले. त्या वक्तव्यावरून मुस्लीम व दलित मतदारांवर त्यांचा आता अजिबात भरोसा राहिला नसल्याचे स्पष्टपणे जाणवले. दोन्ही वर्गातील मतदारांची साथ आपल्याला तीन महिन्यांवर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही मिळणार नाही, असेही मंत्री पाटील यांनी गृहीत धरल्याचे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आले. त्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे.