जनतेसाठी मीच जळगावचा जिल्हाप्रमुख आणि मुख्यमंत्री आहे : गुलाबराव पाटील
जळगाव टुडे । “आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत आपण भेदभावाचे आणि जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. पालकमंत्री असतानाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्याचे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जनतेसाठी मीच कायम जळगावचा जिल्हाप्रमुख आणि मुख्यमंत्री राहिलो आहे. कोणतेही काम करण्यासाठी जनता आमच्याकडे येते आणि त्यांची कामे होतात,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. (Gulabrao Patil)
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता.05) त्यांच्या मूळगावी पाळधी (ता.धरणगाव) येथील बाजारपेठ मैदानावर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला मंत्री श्री.पाटील यांनी संबोधित केले. याप्रसंगी व्यासपीठावर जळगावच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती स्मिता वाघ, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, चोपड्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील, धरणगाव तालुकाप्रमुख डी.ओ.पाटील, माजी जि.प.सदस्य गोपाल चौधरी, बाजार समितीचे सभापती गजानन पाटील, भाजपचे सुभाष पाटील, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष संजय महाजन, मुकुंद नन्नवरे, राजेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर महाजन आदी उपस्थित होते.
दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवशी पाळधीत दोन रूग्णवाहिकांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरासह वृक्षारोपणासारखे सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप झाले. पालक नसलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील स्वीकारले. लोकार्पण झालेल्या दोन्ही रूग्णवाहिका असोदा येथील तुषार महाजन मित्र परिवार आणि जीपीएस मित्र परिवराला सोपविण्यात आल्या. दरम्यान, जाहीर सभेच्या ठिकाणी मंत्री पाटील यांनी आतापर्यंत केलेल्या विकासकामांची चित्रफीत दाखविण्यात आली. संदीप केदार यांनी सूत्रसंचालन केले.