Gulabrao Deokar : गुलाबराव देवकरांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे सगळेच बाहेर काढले !
जळगाव ग्रामीणमधील रस्त्यांची निकृष्ठ कामे, अवैध धंद्यांच्या विरोधात डागली तोफ
Gulabrao Deokar : विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागल्यानंतर विशेषतः जळगाव ग्रामीण मतदारसंघातील राजकीय वातावरण आतापर्यंत फक्त सोशल मीडियावर तापलेले दिसत होते. मात्र, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज प्रसार माध्यमांसमोर येऊन थेट पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या विरोधात आज तोफ डागली. जळगाव ग्रामीणमधील पालकमंत्री पाटील यांच्या अनागोंदी कारभारावर देखील त्यांनी निशाणा साधला. याशिवाय माझे मुद्दे चुकीचे असतील तर पालकमंत्र्यांनी ते खोडून दाखवावे, असेही आव्हान माजी मंत्री श्री.देवकर यांनी दिले.
Gulabrao Deokar took out all the Guardian Minister Gulabrao Patil !
जळगाव ग्रामीण मतदारसंघासह जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील शेतीसह रस्ते तसेच सिंचनाच्या प्रश्नांकडे प्रामुख्याने लक्ष वेधून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर कडाडून टीका केली. यावेळी राष्ट्रवादीच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील तसेच बाजार समितीचे संचालक दिलीप धनगर आदी उपस्थित होते.
अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, पाहणीसाठी शासकीय यंत्रणाच फिरकलेली नाही….
जळगावसह धरणगाव तालुक्यात अतिवृष्टीने शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. संबंधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची आवश्यकता असताना कृषी व महसूल विभागाची यंत्रणा तिकडे पाहणीसाठी सुद्धा फिरकलेली नाही. त्यामुळे पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी केली.
पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातीलच केळी उत्पादक पीकविम्याच्या भरपाईपासून वंचित…
जळगाव जिल्ह्यातील सुमारे ६८८६ केळी उत्पादकांना त्यांच्या हक्काची हवामानावर आधारीत पीकविमा भरपाई अजुनही मिळालेली नाही. जिल्हा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत मंजूर झालेले दावे कृषी आयुक्तांच्या कार्यालयात पडून आहेत. दुसरीकडे कृषी मंत्री केळीचा पीकविमा मिळणार नसल्याचे सांगत आहेत. मग पालकमंत्री करतात तरी काय, त्यांच्याच मतदारसंघातील केळी उत्पादक विम्याच्या रकमेपासून वंचित राहतात तरी कसे, असेही प्रश्न माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी उपस्थित केले. दरम्यान, सन २०१२ मध्ये आपण कृषी राज्यमंत्री असताना केळीला हवामानावर आधारीत पीकविमा योजना लागू केल्याचा जीआर त्यांनी पुरावा म्हणून सादर केला.
शेळगाव बॅरेजवरील उपसा सिंचन योजनेचे श्रेय घेण्याचा पालकमंत्र्यांकडून प्रयत्न….
तापी नदीवर पूर्णत्वास आलेल्या शेळगाव येथील बॅरेजच्या उपसा सिंचन योजनेला शासनाने तत्वतः मान्यता देऊन सुमारे ५९२ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, त्यासाठी चोपड्याच्या आमदार लताताई सोनवणे यांनी पाठपुरावा केलेला असताना, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे वैयक्तिक त्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत, असाही आरोप माजी मंत्री श्री.देवकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
जळगाव ग्रामीणमधील दारू, सट्टा, वाळू वाहतुकीला पालकमंत्र्यांचा आशीर्वाद ?
जळगाव तसेच धरणगाव तालुक्यात गावठी, देशी-विदेशी दारू तसेच सट्टा, पत्ता यासारखे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. वाळु वाहतुकीला देखील ऊत आलेला आहे. सर्वसामान्य जनता त्यामुळे कमालीची त्रस्त झालेली आहे. या सर्व अवैध धंद्यांना पालकमंत्र्यांचा आशीर्वाद तर नाही, असा सवाल करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही तिकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे गुलाबराव देवकर म्हटले.
जळगाव ग्रामीणमधील रस्त्यांच्या निकृष्ठ कामांची चौकशी झालीच पाहिजे…
विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील फुपनगरी ते वडनगरी तसेच जामोद ते गाढोदा, पाळधी ते सोनवद यासारख्या बऱ्याच रस्त्यांसाठी करोडो रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. प्रत्यक्षात आपल्याच मर्जीतील ठेकेदारांना टक्केवारी घेऊन कंत्राट देण्यात आल्याने सर्व रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची झालेली आहेत. आपल्याच कार्यकर्त्यांना कामे देऊन नंतर त्यांना पाठीशी घालण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले आहे. अधिकाऱ्यांशी संगनमत करून पालकमंत्र्यांनी रस्त्यांच्या कामातून करोडो रुपये लाटल्याचा आरोप करून वर्ष-दीड वर्षातच खड्डे पडलेल्या तसेच वाहुन गेलेल्या रस्त्यांच्या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील गुलाबराव देवकरांनी केली. रस्त्यांच्या निकृष्ठ कामांविषयी आपण अँटी करप्शन विभागाकडे तसेच गूण नियंत्रण विभागाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बलून बंधाऱ्यांवरून निवडणुकीच्या तोंडावर केले जात आहे फक्त राजकारण….
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांच्या प्रस्तावाला महाविकास आघाडीचे सरकार असतानाच सन २०१२ मध्ये चालना मिळाली होती. दुर्दैवाने त्यानंतर महायुतीचे सरकार आले आणि बलून बंधाऱ्यांच्या कामाला पुढे खीळ बसली. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आताही निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत जाऊन निवेदन देऊन आले आहेत. मात्र, त्यामाध्यमातून ते जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करीत असल्याचा आरोपही श्री.देवकर यांनी केला.
गद्दार कोण आणि खोके कोणी घेतले, हे जनतेला चांगलेच माहिती आहे…
माझे मुद्दे चुकीचे असतील तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ते खोडून दाखवावे. जनता हुशार आहे. त्यांना पक्के माहिती आहे, की गद्दार कोण आहे आणि खोके कोणी घेतले आहे. त्यांच्या तोंडाला फेस आणण्याचे काम मी केले आहे. दोन्ही बाप-बेट्यांना मी एकटा पुरेसा असून, घोडा मैदान जवळच आहे. माझ्या जळगाव ग्रामीणमधील झंझावाताने त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. जी व्यक्ती स्वतःच्या पाळधी गावात उजेड पाडू शकली नाही, ती मतदारसंघाचा काय विकास करेल. त्यांच्या पाळधी गावातील बसस्थानकापासून मुख्य रस्ता तसेच स्ट्रीट लाईटचे काम माझ्या कार्यकाळातच झाले आहे, असाही दावा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या विरोधात बोलताना प्रसार माध्यमांसमोर केला.