ममुराबादच्या पुरग्रस्त कुटुंबांना पालकमंत्र्यांतर्फे एक महिन्याच्या किराणा साहित्याचे वाटप
जळगाव । गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे साईबाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संबंधित नागरिकांच्या मदतीला पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ( Gualabrao Patil ) धावून आले आहेत. नुकसानग्रस्त कुटुंबियांना त्यांनी एक महिन्याच्या किराण्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत त्यांना मदतीचा हात दिला आहे.
गेल्या महिन्यात जळगाव शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यात ममुराबाद येथील खंडेरावनगर भागातील चार घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे गरिब शेतकरी कुटुंबाच्या घरातील धान्य ओलं झालं होतं. यामुळे या कुटुंबियांवर मोठं आर्थिक संकट ओढवलं होतं. या संकटात ना.गुलाबराव पाटील त्यांच्या मदतीला धावून आले.
पालकमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, सरपंच हेमंत चौधरी, माजी सरपंच महेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्. संतोष कोळी, सचिन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, माजी सदस्य शरद पाटील, राहुल ढाके, शिवसेना गट प्रमुख किरण पाटील यांनी पालकमंत्र्यांतर्फे सर्व नुकसानग्रस्त कुटुबांना तेल, साखर, शेंगदाणे, पीठासह एक महिन्याचा किरणा व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.