मोठी बातमी; सोन्याचा भाव मागणी वाढल्याने आकाशाला घालणार आता गवसणी !
जळगाव टुडे । जगभरात वाढत चाललेली तणावाची स्थिती लक्षात घेता ग्राहकांचाही कल सोन्याच्या खरेदीकडे वाढत आहे. महागाईपासून बचावासाठी सोन्याच्या मागणीत सातत्याने वाढ होत असताना, जगभरातील बँकांचा कल देखील सोन्याच्या खरेदीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल म्हणजेच डब्ल्यूजीसीच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत केंद्रीय बँकांनी सुमारे २९० टन सोने खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे. ( Gold Price News )
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी २०२३ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेसह अन्य केंद्रीय बँकांनी सुमारे १,०३७ टन सोने खरेदी केले होते. याशिवाय त्याच्या मागील वर्षी सन २०२२ मध्ये १,०८२ टन सोने खरेदी झाली होती. विशेष म्हणजे ती इतिहासातील दुसरी सर्वात मोठी वार्षिक सोने खरेदी ठरली होती. उल्लेखनीय म्हणजे जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत देखील केंद्रीय बँकांनी पुन्हा २९० टन सोने खरेदी केली आहे. पुढील काळातही बँकांची सोने खरेदी थांबणार नसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, खरेदीसाठी सुरू झालेली बँकांमधील स्पर्धा लक्षात घेता सोन्याचे भाव लवकरच आकाशाला गवसणी घालतील, असेही जाणकारांमधून बोलले जात आहे.
सोने एक लाख रूपयांचा भाव गाठण्याची शक्यता
तिकडे युक्रेनमध्ये अद्यापही युद्धाचे ढग निवळलेले नाही. अमेरिका-चीनमधील तणाव देखील दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरात महागाईत घट होऊनही आर्थिक सुधारणेचा वेग असमान आहे. याशिवाय युद्ध व तणावाच्या परिणामांपासून वाचण्याची कसरत मध्य-पूर्वेत सुरू आहे. जगात आतापर्यंत जेवढे सोने उत्पादन झाले आहे, त्यापैकी सुमारे २० टक्के सोने केंद्रीय बँकांकडे जमा आहे. त्यानंतर आता चीन आणि रशियाकडून सुद्धा सर्वाधिक सोने खरेदीला वेग देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एकूण चित्र लक्षात घेता सोने लवकरच एक लाख रूपये तोळ्याचा भाव गाठण्याची शक्यता त्यामुळे व्यक्त होते आहे.