‘परदेशातील शिक्षण व संधी’ या विषयावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मार्गदर्शन
Godawari College : पदवीपर्यंतचे शिक्षण भारतात झाल्यानंतर आपल्याकडील अनेक विद्यार्थी परदेशी शिक्षणाच्या वाटा शोधू लागतात. शिक्षणासाठी कोणत्या देशात जावे, कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम निवडावा, कोणत्या अभ्यासक्रमांना कोणत्या देशात मागणी आहे, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या देशात नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? अशा अनेक प्रश्नांचा सामना विद्यार्थी आणि पालकांना करावा लागतो.या अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात परदेशातील शिक्षण व संधी, या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून एज्युकेशन यूएसए डव्हायझरच्या अदिती लेले उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), प्राध्यापक दीपक झांबरे (समन्वयक तंत्रनिकेतन), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा. निलेश वाणी (संगणक विभाग प्रमुख), डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स विभाग प्रमुख) तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
अदिती लेले यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यात त्यांनी परदेशात शिक्षण घेण्यामागची काही प्रमुख कारणे विषद करतांना सर्वोत्तम विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न, विविध क्षेत्रांचे शिक्षण देणारे अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय संस्कृतीचा अनुभव, परदेशातील उच्चशिक्षित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना भेटण्याची, उपलब्ध कोर्सेसमधून आपल्या मनाप्रमाणे शाखा आणि विषय निवडण्याची संधी.त्याचप्रमाणे अमेरिकेतील शिक्षण पद्धती विषयी सांगताना तेथील दर्जेदार शिक्षण, शिक्षणपद्धती, फ्लेक्सिबिलिटी, अभ्यासक्रमातील वैविध्य आणि विद्यार्थ्यांना सर्वोत्तम बनवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, अशा अनेक कारणांमुळे अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी देशा-विदेशातून विद्यार्थी येत असतात. अमेरिकेत अनेक सार्वजनिक आणि खासगी विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांमधून विविध क्षेत्रांचे शिक्षण देणारे भरपूर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत असे नमूद केले.त्यांच्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना विविध एंट्रन्स एक्झाम, विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप, विविध योजना समजावून सांगितल्या.तसेच भविष्यात ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छा असेल त्यांना व्यक्तिगत रित्या मार्गदर्शन करण्यात येईल याचे आश्वासन दिले.सदर कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून प्रा. निलेश वाणी, प्रा. प्रशांत शिंपी यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व डॉ. केतकी पाटील यांनी कौतुक केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वजीहा सय्यद या विद्यार्थिनीने केले.