Girish Mahajan-Eknath Khadse : मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या पत्नीविषयी केले ‘हे’ खळबळजनक वक्तव्य…!
Girish Mahajan-Eknath Khadse : आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय दिवाळीनंतर होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच स्पष्ट केले. खडसेंचे राजकीय प्रतिस्पर्धी मंत्री गिरीश महाजन यांनीही खडसेंचा भाजपात प्रवेश झाल्यास मी फटाके फोडून त्यांचे स्वागत करेन,” असे म्हटले होते. प्रत्यक्षात मंत्री महाजन यांनी दोनच दिवसात पुन्हा एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी खडसेंच्या पत्नीला देखील लक्ष्य केले आहे.
Girish Mahajan-Eknath Khadse : Minister Girish Mahajan made ‘this’ sensational statement about Eknath Khadse’s wife…!
मंत्री गिरीश महाजन यांनी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यात माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसेंवर टीकास्त्र सोडले. “एकनाथ खडसे यांचा राजकीय प्रवास मोठा होता, मात्र आता ते दुसऱ्या पक्षात गेले आहेत. त्यांचे काहीच शिल्लक राहिलेले नाही,” असे खोचक विधान करत महाजनांनी खडसेंवर हल्लाबोल केला. तसेच “एकनाथ खडसे पक्ष सोडून गेले, नंतर त्यांचे काय राहिले, त्यांच्या पत्नीसुद्धा निवडणूक हरल्या,” असेही मंत्री गिरीश महाजन म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमके काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन ?
नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंच्या राजकीय प्रभावाबाबत देखील वक्तव्य केले. “एकनाथ खडसे हे जळगावमध्ये मोठे नेते होते, पण ते दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत काहीच शिल्लक राहिले नाही. खडसे सांगत असतील की माझे असे होते, माझी दूध डेअरी होती, पण त्यांच्या पत्नी देखील दूध डेअरीच्या निवडणुकीत पराभूत झाल्या. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीचा पराभव केला. एवढेच नव्हे तर जळगाव जिल्हा सहकारी बँकेमध्येही त्यांचे काहीच उरले नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या कन्येचा देखील पराभव झाला.” महाजनांच्या या टीकेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, खडसे समर्थकांमध्ये सुद्धा अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे आता गिरीश महाजनांच्या टिकेला कशा प्रकारे उत्तर देतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.