भाजप नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊतांना दिली ‘घर कोंबडा’ उपाधी…!
जळगावची जागा पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आव्हान
Girish Mahajan : जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने पारोळ्याचे करण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांना पराभूत करण्यासाठीच आम्ही जळगावात उमेदवार दिल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. दुसरीकडे मंत्री महाजन यांनीही राऊतांना घरकोंबडा उपाधी देऊन त्यांनी जळगावला येऊन बसावे. मी जळगावची जागा पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून आणतो, असे खुले आव्हान दिले आहे.
भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी पदाचा राजीनामा देऊन शिवसेना ठाकरे गटात नुकताच प्रवेश केला. पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पाटील यांना पाठींबा दर्शवून भाजपच्या विरोधात जय महाराष्ट्रचा नारा देखील दिला. त्याअनुषंगाने जळगावची जागा शिवसेना ठाकरे गटाने प्रतिष्ठेची केल्यानंतर भाजपनेही काहीही करून ही जागा सुमारे पाच लाखांच्या मताधिक्याने जिंकायचीच, असा निर्धार केला आहे. अशा या परिस्थितीत जळगाव लोकसभा मतदारसंघात आतापासूनच मोठी चुरस निर्माण झालेली असताना, भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी काढली संजय राऊत यांची औकात
जळगावच्या जागेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊंतांना चांगलेच लक्ष केले आहे. मंत्री महाजन हे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, की “शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना सांगा तुम्हाला माझे खुले आव्हान आहे. महाराष्ट्रभर फिरण्यापेक्षा थेट जळगावमध्ये येऊन बसा. मी जळगावची जागा पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून दाखवतो. गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीतही जळगावमध्ये साडेचार लाखांवर मताधिक्य होते. यावेळी पाच लाखांपेक्षा कमी मताधिक्य राहणार नाही. मी तुमच्यासारखा घरकोंबडा नसून, घरात बसून आरडाओरड करणारा नाही. माझी औकात संपूर्ण महाराष्ट्राला आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे. एखाद्या सोप्या वाटणाऱ्या जागेवर उभे राहून तुम्ही आमदार व खासदार बनून दाखवा. मग तुम्हाला तुमची औकात समजेल.”