“एक संधी नाकारताच पक्ष सोडून जाणाऱ्यांना येणाऱ्या काही दिवसातच त्यांची जागा कळेल”

चाळीसगावमधील मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन यांची उन्मेश पाटलांवर टीका

Girish Mahajan | “पक्ष संघटनेत काम करताना अनेकांना नवीन संधी मिळते तर काहींना थांबावे पण लागते. कामाचे मूल्यमापन करून पक्ष नवीन संधी व जबाबदाऱ्या देत असतो. हरिभाऊ जावळे, ए.टी.नाना पाटील, स्मिताताई वाघ यांच्यासारखी अनेक उदाहरणे आपल्या जिल्ह्यातील देता येतील, ज्यांना पुढे पक्षाने दुसऱ्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र, एक संधी नाकारताच पक्ष सोडून जाणे म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची व आपल्याला मत देणाऱ्या जनतेची फसवणूक करण्यासारखे आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच त्यांना त्यांची जागा कळेल,” अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगावात उन्मेश पाटलांचा नामोल्लेख न करता केली.

चाळीसगाव शहरात भाजपा तसेच शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी, रिपाई, रासप, रयत क्रांती यांच्या महायुतीचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मंत्री श्री. महाजन बोलत होते. सदर मेळाव्याला महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्यासह आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री एम.के.अण्णा पाटील, माजी आमदार साहेबरावजी घोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार चव्हाण, स्मिताताई वाघ, माजी केंद्रीय मंत्री पाटील, माजी आमदार घोडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष जळकेकर, पवनराजे सोनवणे, संजय पवार, अमोल शिंदे, आनंद खरात, जेष्ठ नेते सुरेश सोनवणे, सुनील निकम, संजय पाटील आदींनी आपल्या जोरदार भाषणांच्या माध्यमातून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले.

“लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि त्यांनी केलेल्या विकासकामांवर आहे. त्यांच्या विकसित भारताच्या संकल्पावर आहे. गेल्या १० वर्षात रेल्वे, हायवे, सिंचन सुविधा यात झालेला आमुलाग्र बदल जनतेसमोर आहे. तसेच जळगाव जिल्हा हा सुरुवातीपासून भाजपा व मोदींवर प्रेम करणारा असल्याने येथील सर्व स्तरावरील मतदार हा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पारचा नार सार्थ ठरवेल,” असा विश्वास देखील राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button