“उन्मेश पाटील व करण पवार यांनी भारतीय जनता पार्टी सोडून खूप मोठी चूक केली आहे”
-मंत्री गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Girish Mahajan | भाजपाचे खासदार उन्मेश पाटील तसेच पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर उशिरा भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पहिल्यांदा प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. “भाजपामध्ये दोघांना पुढे मोठे भवितव्य होते. पण त्यांनी खूप घाई केली. दोघांना पुढे कळेल की त्यांनी किती मोठी चूक केली आहे म्हणून,” असा सूचक इशारा देखील मंत्री महाजन यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिला.
शिवसेना ठाकरे गटात गेल्यानंतर उन्मेश पाटील एका मुलाखतीत असे म्हणाले आहेत, की देवेंद्र फडणवीसांना चांडाळ चौकडीने घेरले आहे म्हणून. त्याबद्दल पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यानंतर मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की “आता पक्ष सोडला म्हणून ते आता काहीही बोलू शकतात. केंद्रीय नेतृत्वाने तुमचे तिकीट नाकारले त्याची कारणे तुम्हाला माहीती आहेत. त्यांना मी वेळोवेळी समज पण दिली होती. त्यांच्याशी बोललो देखील होतो. त्यांच्याशी चर्चा केली होती. ते जर असे म्हणत असतील की फडणवीसांना चांडाळ चौकडीने घेरलेले आहे. मला वाटते आपले काय चुकले म्हणून त्यांनी आधी आत्मपरिक्षण केले पाहिजे. असे बोलून नाही चालणार, पक्षाची एवढी प्रगती यांच्यामुळे झाली आहे का ? त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. तिकीट नाकारले म्हणून त्यांनी काहीही बोलायचे, हे योग्य नाही, आम्ही त्यांच्या म्हणल्याला महत्व देत नाही. आता घोडा मैदान समोर आहे. तुम्ही विरोधात आहात ना आता लढा आणि दाखवा. समजेल तुम्हाला किती लोक तुमच्या पाठीमागे किती आहेत म्हणून.”
त्यांना वर्षभरापासून सांगत होतो…..
“त्यांना वर्षभरापासून सांगत होतो. अंतर्गत काही गोष्टी होत्या, त्याबद्दल समज देखील दिली होती. आपल्या चुका लपविण्यासाठी कोणावरही आरोप करायचे, तेवढी पात्रता आहे का त्यांची देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलण्याची. त्यांना भाजपमध्ये कोणीच डावलले नव्हते. त्यांना कोणत्या बैठकांना बोलावले नव्हते. कोणत्या बैठका झाल्या ? मी स्वतः आज दुसऱ्यांदा जिल्ह्यात आलो आहे. इकडे सांगतात मी पक्षाचे काम करेल, दुसरीकडे पक्षाचा राजीनामा देतात आणि मला डावलले म्हणतात.,” असेही मंत्री गिरीश महाजन हे प्रसार माध्यमांसमोर उन्मेश पाटील यांना उद्देशून म्हणाले.