मंत्री गिरीश महाजनांच्या भगीरथ प्रयत्नांनी जामनेर तालुक्यातील हजारो एकर कोरडवाहू शेती होणार सुजलाम सुफलाम
Girish Mahajan : राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या भगीरथ प्रयत्नांनी वाघूर धरणातील पाण्याचा उपसा करून तो जामनेर तालुक्यातील कोरडवाहू शेती असलेल्या शेतकर्यांच्या थेट बांधापर्यंत पोहचवणारी वाघूर उपसा सिंचन योजना पूर्णत्वास आली आहे. यामुळे संपूर्ण जामनेर मतदारसंघातील हजारो एकर कोरडवाहू शेती सुजलाम सुफलाम होणार असून, कोरडवाहू शेतकऱ्यांच्या जीवनात सुख व समृद्धीचे दिवस येणार आहे.
ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते वाघूर उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, तुकाराम निकम, शरद पाटील सर, संजय गरुड, जे. के.चव्हाण, प्रशांत सोनवणे, जितेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, विलास पाटील, दुध संघाचे संचालक अरविंद देशमुख, राजमल भागवत, नवल राजपुत, अतिश झाल्टे, रमेश नाईक, नाजिम पार्टी, नीलेश चव्हाण, दीपक तायडे, रविंद्र झाल्टे, भदाने साहेब, विनोद पाटील, कमलाकर पाटील उपस्थित होते.
जामनेर तालुक्यातील 19 हजार 132 हेक्टर शेती क्षेत्र ओलीताखाली येणार
ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी वाघूर धरण पूर्णत्वास आले. यानंतर धरणाचे पाणी शेतकर्यांना थेट बांधावर मिळावे या हेतूने त्यांनी वाघूर उपसा सिंचन योजनेचा पाठपुरावा सुरू केला. राज्यातील उपसा सिंचन योजना बंद पडलेल्या असताना किंवा त्यासाठी निधी नसतांना वाघूर उपसा सिंचन योजनेसाठी तब्बल 2288 कोटी 61 लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली असून हे काम आता पूर्ण झाले आहे. ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याहस्ते त्या कामाचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले. वाघूर उपसा सिंचन योजना ही दोन टप्प्यात असून यांच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील एकूण 19 हजार 132 हेक्टर शेती क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. यासाठी 3810 शेततळे करण्यात आले असून या शेततळ्यांमध्ये वाघूरचे पाणी हे बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून पोहचवण्यात आले आहे. तब्बल 46 गावांमधील हजारो शेतकर्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकर्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करणारी ही राज्यातील एकमेव वैशिष्ट्यपूर्ण योजना असून यामुळे तालुक्याचा अक्षरश: कायापालट होणार आहे. या माध्यमातून ना. गिरीशभाऊ महाजन हे जामनेर तालुक्यासाठी खर्या अर्थाने भगिरथ बनले असल्याची भावना तालुक्यातून व्यक्त होत आहे.
बोदवड परिसर सिंचन योजनेला गती
दरम्यान, ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रयत्नांनी बोदवड परिसर सिंचन या योजनेतील टप्पा -1 मधील 32540 हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी दाबयुक्त बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या कामासाठी यांच्या अथक पाठपुराव्यामुळे कामे सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. या योजनेस रु. 3753.61 कोटी किंमतीस तिसरी सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. सद्यस्थितीत टप्पा-1 ची पुर्णा नदी जुनोने धरण जोडणारी उपसा प्रणाली व जुनोने धरणाची कामे 85% पुर्ण झाली आहेत, जुन 2025 मध्ये जुनोने धरणामध्ये पाणीसाठा करण्याचे नियोजन आहे. योजनेच्या टप्पा-1 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील, मुक्ताईनगर तालुक्यातील-6, जामनेर- 11 व बोदवड तालुक्यातील 33 आणि बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील -18 व मोताळा तालुक्यातील -15 आशा एकूण 83 गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यामुळे 32540 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
भागपुर सिंचन योजनेला 2262.12 कोटी रूपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणार
भागपुर उपसा सिंचन योजना (ता. जि. जळगांव) या योजनेंतर्गत भाग-1 व भाग-2 चा समावेश आहे. भाग-1 मध्ये दोन टप्प्यात शेळगांव बॅरेजच्या पश्च फुगवट्यातुन तापी नदीचे पूराचे पाणी कडगांव येथील वाघूर नदीतून उचलुन (लिफ्टद्वारे) 192.07 दलघमी पाणी, 120 दिवसात उपसा करुन प्रस्तावित भागपूर जलाशयात पाणी टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सदर भाग-1 चा पाणीवापर हा सिंचनासाठी 91.28 दलघमी असुन त्याव्दारे जळगांव तालुक्याचे 26 गांवाचे एकूण 13904 हे. सिंचन क्षेत्र भिजविणे प्रस्तावित आहे. ‘भाग-2 मध्ये भागपूर जलाशयातून पाणी टप्पा क्र. 1 ते 3 अनुक्रमे पंपगृह क्र.3, 4 व 5 द्वारे 98.35 दलघमी पाणी उचलून वितरण कुंडात टाकणे व तेथून गुरुत्वनलिकेद्वारे विविध 5 मध्यम व 44 लघु (५ मध्यम प्रकल्प मध्यम प्रकल्प- 1. कमानी, 2. अग्णावती, 3. तोंडापुर, 4.हिवरा, 5. बहुळा व 44 लघु प्रकल्प- 1. गोगडीनाला 2. देव्हारी, 3. सुर, 4. शिरसोली नेहेरे, 5. दिघी-2, 6. उमरदे, 7. वाणेगाव राजुरी, 8. गाळण -2, 9. घोडसगाव, 10. दिघी -3, 11. शहापुर, 12. वाकडी, 13. शेंदुर्णी, 14. धानवड, 15. गालन, 16. बडारखा, 17. गारखेडा, 18. सर्वे काजोळा, 19. म्हसळा, 20. बांबरुड, 21. वाकडी, 22. लोहारा, 23. गहुळा, 24. पिंपळगाव हरे, 25. कोल्हे, 26. सातगाव, 27. सर्वेपिंप्री, 28. कळमसरा, 29. गोंदेगाव, 30. चिलगाव, 31. पिंपळगाव वकोद, 32. बिलवाडी, 33. शेवगा, 34. मोहाडी, 35. मोयखेडा दिगर, 36. भगदरा, 37. महुखेडा, 38. लहसर, 39. पिंप्री, 40. गोद्री, 41. हिवरखेडा, 42. कांग, 43. अटलगव्हाण, 44. पिंप्री डांभुर्णी) प्रकल्पांच्या जलाशयात पाणी टाकण्याचे प्रस्तावित आहे. या मध्ये जळगांव तालुक्यातील 2 लघु प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र 320 हे., जामनेर तालुक्यातील 2 मध्यम व 20 लघु प्रकल्प, कांग व एकुलती सा.त.चे क्षेत्र सिंचन 8683 हे. व पाचोरा तालुक्यातील 3 मध्यम व 22 लघु प्रकल्प, गोलटेकडी ल.पा. चे क्षेत्र सिंचन 7857 हे. असे भाग-2 पासून 16860 हे. सिंचन क्षेत्रास लाभ मिळणार आहे. एकूण भागपुर उपसा सिंचन योजनेचे भाग-1 व भाग-2 द्वारे 30,764 हे. सिंचन क्षेत्रास लाभ मिळणार आहे. सदर भागपुर उपसा सिंचन योजनेच्या भाग-2 ला ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रयत्नाने मा. मुख्यमंत्री यांची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे भागपुर उपसा सिंचन योजनेच्या रु. 2262.12 कोटी किंमतीच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावास शासनाची मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.