Girish Mahajan : अनंत अंबानीच्या शाही विवाह सोहळ्याला मंत्री गिरीश महाजन यांचीही सहकुटुंब उपस्थिती
Girish Mahajan : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि सून राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चा होती. या सोहळ्यावर झालेला अफाट खर्च, चमकधमक आणि सिलेब्रिटींचा राबता, अशा एक ना अनेक गोष्टींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याठिकाणी भाजपचे संकटमोचक नेते तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनीही दोन्ही मुली तसेच जावयांसह सहकुटुंब उपस्थित राहून वधूवरांना पुढील वैवाहीक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
Girish Mahajan
बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूडची स्टार मंडळी तसेच देश-विदेशातील दिग्गज राजकारणी, उद्योजक, क्रिक्रेटपटू यांनी अनंत आणि राधिकाच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहुन चार चाँद लावले. गुजरातच्या जामनगरमध्ये झालेल्या प्री-वेडिंग सेरेमनीपासून अनंत आणि राधिकाच्या शाही लग्नाची सुरुवात झाली होती. प्रत्यक्ष विवाह सोहळा नुकताच धामधुमीत पार पडलेला असला तरी अजूनही या लग्नाचे काही कार्यक्रम बाकी राहिले आहेत. मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला असून, त्यांच्या घरातील हा विवाहाचा शाही थाट पाहुन अख्खी मुंबई अचंबित झाली आहे.
किती पैसा खर्च झाला अनंतच्या लग्नावर ?
रिलायन्स उद्योगाचे मालक असलेल्या अंबानी कुटुंबासाठी अनंत आणि राधिका यांचा विवाह सोहळा खूपच खास होता. त्यामुळे त्यांनी या विवाह सोहळ्याच्या आयोजनात कोणतीच कसर ठेवली नाही. त्यांच्या या सोहळ्यात विदेशातील कलाकारांनी सुद्धा सहभाग घेतला आणि उपस्थितांची करमणूक केली. प्री वेडींगसारख्या कार्यक्रमात तर बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांसारखे अब्जाधीशही सहभागी झाले होते. भूतो न भविष्यती अशा या विवाह सोहळ्यावर पैशांचा किती चुराडा झाला असेल, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मुकेश अंबानी यांनी त्यांचा मुलगा अनंत याच्या विवाह सोहळ्यावर तब्बल ५००० कोटी रूपये खर्च केले आहेत. ज्यामुळे या विवाह सोहळ्याची जगातील सर्वात महाग विवाह सोहळ्यात गणना करण्यात आली आहे.