मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ जागांविषयीचे वक्तव्य चर्चेत !
जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला देखील लागला आहे. जळगाव जिल्ह्यातही महायुती व महाविकास आघाडीने त्यादृष्टीने हालचालींना आता वेग दिला आहे. दरम्यान, भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व ११ जागांविषयी मोठे वक्तव्य भाजपच्या समिक्षा बैठकीत केले. त्याची सध्या सगळीकडे चर्चा देखील आहे. ( Girish Mahajan )
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या समिक्षा बैठकीचे आयोजन भाजपचे निरीक्षक आ.रणधीर सावरकर तसेच प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथे ब्राम्हण सभेत करण्यात आले होते. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसघांचा आढावा देखील मान्यवरांच्या उपस्थित घेण्यात आला. या बैठकीस खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांच्यासह जिल्हा व मंडळ स्तरावरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच बैठकीत बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठे वक्तव्य केले.
काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन ?
लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात महायुतीसाठी प्रतिकूल वातावरण असताना, जळगाव आणि रावेरच्या जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी एकदिलाने काम केले. विधानसभेच्या आगामी निवडणुकीतही जळगाव जिल्ह्यातील ११ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आता काम करू. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व जागा निवडून येतील, असा शब्द आपण वरिष्ठांना दिला असल्याचे वक्तव्य गिरीश महाजन यांनी बैठकीत केले. याशिवाय लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे यादीत नव्हती. त्यांची नावे समाविष्ट करून घ्या आणि नवीन मतदार जोडा तसेच घरोघरी जाऊन सर्वेक्षण करा, अशाही सूचना सुद्धा त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. दरम्यान, रणधीर सावरकर आणि राजेंद्र गावित यांनीही महायुतीच्या लोकसभेतील कामगिरीचे कौतूक केले.