गिरीश महाजनांनी अखेर कबूल केले….स्मिता वाघांचे तिकीट कापण्यात त्यांचाच होता हात !

जळगाव टुडे । लोकसभेच्या सन 2019 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत भाजपकडून एबी फार्म मिळाल्यानंतरही जळगावमधून स्मिता वाघ यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करण्यात आली होती. नंतर त्यांच्या जागी चाळीसगावचे तत्कालिन आमदार उन्मेश पाटील यांना तिकीट देण्यात आले होते. दरम्यान, माझ्याच सांगण्यावरून पक्षाने स्मिता वाघ यांचे तिकीट नाकारले होते, अशी जाहीर कबुली भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यांच्या त्या वक्तव्याने सगळीकडे चांगलीच खळबळ सुद्धा उडाली आहे. ( Girish Mahajan )

लोकसभेच्या निवडणुकीनंतर जळगाव मतदारसंघातील भाजपच्या जिल्हा व मंडळ स्तरावरील पदाधिकाऱ्यांची समिक्षा बैठक आज रविवारी (ता.२३) पार पडली. त्यात बोलताना मंत्री श्री.महाजन यांनी स्मिता वाघ यांच्या गेल्या वेळच्या उमेदवारी संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. आपल्या भाषणातून अनेक बाबी त्यांनी उलगडल्या तसेच भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात गेलेले माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला. उमेदवारी मिळाली नाही म्हणून भाजप सोडून गेलेल्या व मित्राला बळीचा बकरा बनविणाऱ्यांची आता काय अवस्था झाली, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. या बैठकीला निरीक्षक आ.रणधीर सावरकर, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी खासदार ए.टी.नाना पाटील आदी उपस्थित होते.

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या स्मिता वाघ यांचे तिकीट मीच नाकारले होते. त्यावेळी त्या विजयी होतील किंवा नाही, मनात थोडी शंका होती. माझ्याच सांगण्यावरून त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द केले होते, असे बोलून गेल्या वेळी स्मिता वाघ यांचे तिकीट कापण्यात आपला हात असल्याची कबुली मंत्री महाजन यांनी समीक्षा बैठकीत जाहीरपणे दिली. त्यामुळे बैठकीला उपस्थित पदाधिकारी एकदम अवाक झाले.

“भारतीय जनता पक्ष सोडून गेलेल्यांना त्यांची जागा दिसलेली आहे. मी-मी म्हणणारे आता कसे घरी बसले आहेत आणि त्यांची काय अवस्था झाली आहे, हे सर्वांनी बघितले आहे. त्यांच्यावर बोलून मला आता तोंडही खराब करायचे नाही”, असे म्हणत मंत्री महाजन यांनी एकनाथ खडसेंवर देखील तोंडसुख घेतले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button