जळगाव जिल्ह्यात लोकसभेसाठी नवीन चेहऱ्यांना संधी…मंत्री गिरीश महाजन स्पष्टच बोलले
Girish Mahajan : लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसात घोषित होण्याची शक्यता असताना, भाजपकडून जळगाव जिल्ह्यात यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यासंदर्भात प्रसार माध्यमांनी छेडल्यानंतर भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (ता.10) थेट पक्षाची भूमिकाच येथे स्पष्ट केली.
“भाजप हा सर्वात मोठा आणि राष्ट्रीय पक्ष असून, तो एका ठराविक परिवाराचा पक्ष नाहीये. आमच्याकडे एक सिस्टीम आहे. त्यानुसार लोकसभेच्या उमेदवारांची निश्चिती होत असते. शरद पवार सांगतील ते ठरले, उद्धव ठाकरे सांगतील त्याला उमेदवारी दिली आणि राहुल गांधी सूचवतील ते नाव निश्चित झाले, असे भाजपमध्ये कधीच होत नाही. आमच्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाहीचे पालन होते. आमच्याकडे एक पद्धती आहे. राज्याची एक सिस्टीम आहे, केंद्राची एक सिस्टीम आहे. त्यानुसार आमच्याकडे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होते. भारतीय जनता पक्ष हा परिवाराचा पक्ष नाही, जनतेचा पक्ष आहे. लोकसभा उमेदवारांच्या निश्चितीसाठी आमच्याकडे एक सर्व्हे झालेला आहे, अंतर्गत चर्चा झालेली आहे. आम्ही स्वतः प्रत्येक मतदारसंघात जाऊन सर्व्हे करून आलो आहोत. त्यामाध्यमातून प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत. त्यानुसार आमचा रिपोर्ट वर पक्षाकडे गेलेला आहे, त्यामुळे उमेदवार निवडीबाबत थोडा वेळ हा लागेल,” असे मंत्री गिरीश महाजन यांनी नमूद केले.
लोकसभेत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबाबत मंत्री श्री. महाजन यांचा मोठा खुलासा
लोकसभेच्या जळगाव तसेच रावेर मतदारसंघात यावेळच्या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबाबत भाजपकडून काही निर्णय झाला आहे का, असा प्रश्न देखील काही पत्रकारांनी जळगावमध्ये उपस्थित केला. तेव्हा “आमची केंद्राची एक निवडणूक कमिटी आहे, तेच लोकसभेच्या उमेदवार निवडीबाबतचा निर्णय घेतील. मला किंवा कोणाला राज्यातील नवीन व जुने उमेदवार ठरविण्याचा अधिकार नाही,” असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.