मराठा-ओबीसी आरक्षण वादावर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांचे मोठे वक्तव्य !
जळगाव टुडे । दोन्ही बाजुने उपोषणाचे हत्यार उपसण्यात आल्यानंतर राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असले तरी अद्याप कोणताच ठोस मार्ग निघू शकलेला नाही. दरम्यान, भाजपचे संकटमोचक नेते मंत्री गिरीश महाजन यांनी आज मराठा-ओबीसी वादावर पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले. त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. ( Girish Mahajan )
मराठा तसेच ओबीसी यांच्यात आरक्षणावरून संघर्ष निर्माण झालेला असताना, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी या वादावर बैठकीतून तोडगा काढण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यामुळे आता भाजपचे संकटमोचक नेते मंत्री गिरीश महाजन यांनी देखील मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीतून मार्ग काढणार असल्याचे म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मराठा व ओबीसी आरक्षणाच्या वादावर सर्वपक्षीय चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढणे योग्य ठरणार असल्याचे बोलून दाखवले आहे. तसेच सरकारकडे चर्चेची मागणीही केली आहे.
दरम्यान, “आगामी पावसाळी अधिवेशनात मराठा-ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार सर्वपक्षीय बैठक घेणार आहे. अधिवेशनात जसा वेळ मिळेल तशी बैठक घेऊन चर्चा केली जाईल. या संदर्भात ठोस पाऊल उचलत कोर्टात टिकणारे आणि दोन्ही समाजाचे समाधान होईल असेच आरक्षण देण्याची आमच्या सरकारची भूमिका आहे. कुठेही दोन समाजात दरी निर्माण होता कामा नये, ही देखील आमची भूमिका आहे”, असेही मंत्री गिरीश महाजन यांनी नमूद केले आहे.